आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नकार:जालना मनपासाठी भाजप-शिवसेनेचा होकार, काँग्रेसकडून मात्र नकार

लहू गाढे | जालना2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना पालिकेने महापालिकेचा ठराव पाठवावा, तत्काळ महापालिकेला मंजुरी देता येईल, असे आदेश तत्कालीन नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी २०२१ मध्ये जालन्याचा आढावा घेताना दिले होते. आता हिंदू महासभेनेही निवेदनातून अशीच मागणी नगरविकास विभागाकडे केली आहे. त्यामुळे जालन्यात महापालिका की नगरपालिका अशीच चर्चा सुरू झाली आहे. यासंदर्भात "दिव्य मराठी'ने प्रमुख राजकीय पक्षातील नेत्यांची मते जाणून घेतली असता भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीकडून महापालिका करण्यास होकार, तर काँग्रेसकडून नकार मिळत आहे.

विविध पक्षांच्या घेतलेल्या प्रतिक्रियांतून आमदार कैलास गोरंट्याल यांनी महापालिका झाल्यास कर जास्त भरावा लागेल, योजनांसाठी ५० टक्के निधी द्यावा लागेल, अशी भूमिका स्पष्ट केली आहे. भाजप, राष्ट्रवादी, वंचितच्या प्रतिनिधींनी जालना महापालिका झाल्यास शहराचा विकास होईल, अशी भूमिका मांडली आहे. लोकसंख्या, शहराच्या वाढलेल्या विस्तारामुळे शहर महापालिका होण्यासाठीच्या निकषात बसत आहे. जालना नगर परिषद ही जालना शहरातील समस्या निराकरण करण्यास कमी पडत असल्याच्या अनेक नागरिकांच्या तक्रारी आहेत. पाणीपुरवठा, पथदिवे, रस्ते सुविधा आदी मूलभूत समस्या सोडवण्यासाठी जालना नगर परिषद असमर्थ ठरत असल्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याचा मुद्दा अनेक संघटनांकडून उपस्थित केला जात आहे.

यामुळे जालना ‘महानगरपालिकेचा’ दर्जा देण्यात यावा अशी मागणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह नगर विकास विभागाकडे करण्यात आली आहे. नगर परिषदेमुळे गेल्या तीन-चार वर्षांत झालेली रस्त्याची व इतर विकासकामे ही दर्जेदार झाल्याचे दिसून येत नाही. शासनाचा निधी यामुळे वाया जात आहे. सांडपाणी प्रक्रिया, घनकचरा प्रकल्प रखडलेले आहेत. पाणीपुरवठा योजनांवर गेल्या दहा वर्षांत ५०० कोटींपेक्षा अधिक खर्च करण्यात आला असला तरी नागरिकांना सरासरी ८ ते १० दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. भुयारी गटार योजना कार्यान्वित नसल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले. यामुळे जालना पालिका महानगरपालिका करा, असे निवेदन हिंदू महासभेचे प्रदेश संघटनमंत्री धनसिंग सूर्यवंशी यांनी नगरविकास विभागाकडे दिले.

जालना महापालिका झाल्यास स्वागत
ग्रामपंचायतचे नगरपंचायत, नगरपंचायतचे नगरपालिका, पालिकेचे महानगरपालिका असे रूपांतर होत असते. यामुळे जालना शहर महापालिका व्हावे. जालना महापालिका झाल्यास भाजप स्वागतच करणार आहे. रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांच्या मार्गदर्शनाखाली शहराचा विकास होतच आहे. यासाठी पाठपुरावाही सुरू ठेवणार आहे.राजेश राऊत, भाजप शहराध्यक्ष, जालना.

अशी होऊ शकेल महानगरपालिका
जालन्याला महानगरपालिका करण्यासाठी २०२१ च्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या किती आहे, पालिकेच्या सर्व सदस्यांचा ठराव नगरविकास खात्याला सादर करावा लागेल. यासाठी जिल्हाधिकारी, मुख्याधिकाऱ्यांसह प्रशासनाच्या बाजूही महत्त्वाच्या ठरणार आहेत. दरम्यान, सध्या पालिकेवर प्रशासक नेमलेला आहे.

विकासाची दृष्टी असलेला नेता हवा
जालना पालिका असो की महानगरपालिका - दोन्हींतून विकास साधता येतो. त्यासाठी नगराध्यक्ष हा विकासाची व्हिजन दृष्टी असलेला नेता हवा. परंतु, लोकसंख्येनुसार महापालिका होणेही गरजेचे आहे. - भास्कर अंबेकर, जिल्हाप्रमुख, शिवसेना, जालना

बातम्या आणखी आहेत...