आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराखोट्या कागदपत्रांआधारे बोगस पीआर कार्ड करून फसवणूक करण्याचे प्रकार जालना शहरात वाढले आहेत. पालकमंत्री अतुल सावे यांच्या रेट्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली आहे. या समितीकडे ऑक्टोबरपासून २१ तक्रारी आल्या आहेत, तर मागील आठ दिवसांमध्ये ठाण्यांत दोन गुन्हे दाखल झाले. यामुळे जालना शहरात बोगस पीआर कार्ड बनवणारी टोळी सक्रिय झाली आहे. या टोळीत भूमी अभिलेखमधील तत्कालीन शासकीय कर्मचारीही सहभागी असल्याचे गुन्हे दाखल झाले आहेत.
जालना शहराचा विस्तार वाढत चालला आहे. शहराला लागून असलेल्या तसेच शहरातील विविध जमिनींचे दर गगनाला भिडले आहेत. वाढत्या दरांमुळे अनेक जण बोगस दस्तऐवज, पीआर कार्ड, खरेदी खत करून अनेकांची फसवणूक करू लागले आहेत. प्लॉट किंवा जमीन त्यावर बनावट नावे टाकून बनावट पीआर कार्ड तयार केले जात आहेत. त्यांची खरेदी-विक्री करून फसवणूक केली असल्यास तक्रारदारांनी कागदपत्रासह आर्थिक गुन्हे शाखेशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिस अधीक्षक अक्षय शिंदे यांनी केले. दरम्यान, आर्थिक गुन्हे शाखेकडेही बोगस पीआर कार्डबाबत दोन तक्रारी आल्याची माहिती भागवत फुंदे यांनी दिली. दरम्यान, बनावट खरेदी दस्तऐवज करून ते खरे असल्याचे भासवून दुय्यम निबंधक कार्यालय येथील कर्मचारी यांच्याशी संगनमत करून प्लॉटची परस्पर विक्री करून फसवणूक केली जाते. यात अनेकांच्या कागदपत्रांचाही वापर केला जातो.
जिल्हाधिकाऱ्यांच्या समितीकडेही २१ प्रकरणे : पालकमंत्री अतुल सावे यांच्या आदेशान्वये बोगस पीआर कार्डबाबत समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीकडे आतापर्यंत एकूण २१ प्रकरणे आली आहेत. यामध्ये ४ प्रकरणांचा निपटारा झाला. प्रकरणांमध्ये फेरफार, अतिक्रमणे अशा बहुतांश तक्रारी आलेल्या असल्याची माहिती भूमी अभिलेख विभागाचे अधीक्षक डी. एल. घोडके यांनी दिली आहे.
केस स्टडी १ : पीआर कार्डवर लागली दुसऱ्यांचीच नावे कल्पना रामनिवास गौड यांनी १९९३ मध्ये प्लॉट घेतला. २०१५ पर्यंत त्यांचे नाव होते. परंतु, आता पीआर कार्डवर दुसऱ्यांचीच नावे आल्याने त्यांनी तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दिली. दिलेल्या फिर्यादीनुसार, प्रशांत मधुकर कुलकर्णी, सिद्दिकी जरिना बेगम अब्दुल नईम, मोहंमद अब्दुल नदीम, तत्कालीन भूमी अभिलेख अधिकारी व प्रेमकिशोर पेशवाणी यांच्याविरुद्ध १ मार्च रोजी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
केस स्टडी २ : रेकॉर्ड पाहणी करताना प्रकार उघड प्रवीण वडगाये यांनी प्लॉट खरेदी केला. हे मुंबईला राहत असल्याने कागदपत्रांची रेकॉर्ड पाहणी करत होते. परंतु, सप्टेंबर २०२२ मध्ये या प्लॉटचे वाटपपत्र झाल्याचे दिसून आले. आता पीआर कार्डवर दुसऱ्यांचीच नावे आल्याने चंदनझिरा पोलिस ठाण्यात मोहनसिंग गुरमुखसिंग सेना, शेख नईम शेख मोहंमद यांच्याविरुद्ध २५ फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.