आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अन् चर्चेवर पडदा:​​​​​​​दानवे विमान प्रवासातच, तरी झळकली राजीनाम्याची ब्रेकिंग न्यूज; अखेर कार्यकर्त्यांचा जीव पडला भांड्यात; चॅनलच्या बातमीने मतदार संघातील कार्यकर्त्यांची वाढली अस्वस्थता

जालनाएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अन्न व नागरी पुरवठा विभागातील काम, राज्यातील सर्वच नेत्यांशी योग्य समन्वय असल्याने वाचले मंत्रिपद

बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. यात काही मंत्र्यांना डच्चू देण्यात आला. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनीही राजीनामा दिल्याच्या बातम्या वृत्तवाहिन्यांवर सुरू झाल्या. विशेष म्हणजे या बातम्या येत होत्या तेव्हा दानवे विमानप्रवासात होते. दिल्लीत पाय ठेवताच त्यांना ही फेक ब्रेकिंग न्यूज समजली. परंतु तोपर्यंत इकडे मतदारसंघातील कार्यकर्ते प्रचंड अस्वस्थ झाले होते. परंतु सायंकाळी सर्व चित्र स्पष्ट झाले आणि दानवे यांनी मोदी-शहा यांचा विश्वास टिकवून ठेवण्यात यश मिळवले आहे हे स्पष्ट झाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून दानवे यांनी शपथ घेतली होती. त्यानंतर राज्यातील भाजपची सूत्रे त्यांच्या हाती देण्यात आल्याने त्यांना केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर दानवे यांना पुन्हा पहिल्याच यादीत केंद्रीय मंत्रिमंडळात समाविष्ट करण्यात आले. भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणून दानवे यांनी राज्यात जे काम उभे केले त्याचे बक्षीस म्हणून त्यांना मंत्रिपद देण्यात आले होते. दरम्यान, बुधवारी मोदी यांच्या मंत्रिमंडळाचा पहिलाच विस्तार संपन्न झाला. यात अनेक मंत्र्यांना डच्चू देण्यात आला. महाराष्ट्रातूनही काही नव्या चेहऱ्यांना संधी देताना काही विद्यमान मंत्र्यांना घरी बसवण्यात आले. यासंदर्भात बुधवारी दिवसभर वृत्तवाहिन्यांवर बातम्या येत होत्या.

त्याच वेळी दुपारी केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे आणि रावसाहेब दानवे यांनी राजीनामा देण्याची ब्रेकिंग न्यूज झळकली. ही बातमी मतदारसंघात वाऱ्यासारखी पसरली. दुपारी २ च्या सुमारास ही बातमी आली तेव्हा दानवे दिल्लीकडे जाणाऱ्या विमानात होते. कार्यकर्ते व जवळचे नातेवाईक खात्री करण्यासाठी त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करीत होते. परंतु विमानप्रवासात असल्याने त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नव्हता. दरम्यान, दानवे यांनी दिल्ली विमानतळावर पाय ठेवताच ही ब्रेकिंग न्यूज त्यांच्या कानावर पडली. शिवाय त्यांना फोनही सुरू झाले. परंतु दानवे मात्र निश्चिंत दिसत होते. दिल्लीतील आपल्या निवासस्थानी पोहोचल्यावर ते नवनिर्वाचित मंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याला हजर राहिले. त्यानंतर वृत्तवाहिन्यांशी बोलताना आपल्याला राजीनामा मागितलाच नाही, तर तो देण्याचा प्रश्नच नाही, असे स्पष्ट केल्याने कार्यकर्त्यांचा जीव भांड्यात पडल्याचे दिसून आले.

दानवेंचा दिल्लीत तळ
मोदी मंत्रिमंडळातील फेरबदलाची चर्चा गेले काही दिवस सुरू असतानाच मंत्री दानवे गेले आठवडाभर दिल्लीत तळ ठोकून होते. मंत्रालयात जाऊन ते नियमितची कामे करत होते. शिवाय त्यांनी काही महत्त्वाच्या बैठकाही घेतल्या. एरवी शनिवार-रविवार मतदारसंघात असणारे दानवे या वेळी शनिवार-रविवारीही दिल्लीत होते. सोमवारी दुपारी ते भोकरदनला आले. त्यानंतर बुधवारी दुपारच्या विमानाने त्यांनी दिल्ली गाठली.

ताईंनी फोन केला अन् बातमी समजली
दानवे बुधवारी दुपारच्या विमानाने औरंगाबादहून दिल्लीकडे निघाले. ते विमानात बसलेच होते तेव्हा त्यांनी राजीनामा दिल्याची बातमी आली. पुढचे दोन-अडीच तास दानवे यांच्याशी कोणताही संपर्क झाला नाही. त्यांच्या दिल्लीतील कार्यालयानेही यात तथ्य नसल्याचे सांगितले. त्यामुळे कार्यकर्ते अस्वस्थ झाले. अनेकांनी त्यांना फोनही केले. दरम्यान, त्यांच्या पत्नी निर्मलाताई दानवे यांनी त्यांच्याशी फोनवर संपर्क केला तेव्हा या बातमीने दानवेही अचंबित झाले. परंतु तोपर्यंत मतदारसंघातील कार्यकर्त्यांची अस्वस्थता वाढली होती. दिव्य मराठीने निर्मलाताई दानवे यांना संपर्क केला तेव्हा त्या निश्चिंत जाणवत होत्या.

कशामुळे वाचले मंत्रिपद
मोदी यांच्या मंत्रिमंडळातील अनेक दिग्गजांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला असताना दानवे यांचे मंत्रिपद मात्र वाचले आहे. रामविलास पासवान यांचे निधन झाल्यानंतरही अन्न व नागरी पुरवठा खात्याचा कारभार दानवे यांनी उत्तम प्रकारे सांभाळला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार देशात अन्नधान्याचे विक्रमी उत्पादन झाले. तेव्हा धान्य साठवण्याची मोठी अडचण होती. हे धान्य सरकारने साठवले तर त्याला मोठा खर्च येतो. त्याऐवजी थेट लाभार्थींना एकदाच धान्य देण्याची अनोखी संकल्पना दानवे यांनी राबवली. त्यांच्या या छोट्या संकल्पनेचा या विभागाला चांगला फायदा झाला. शिवाय प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करताना भाजपच्या राज्यातील सर्वच नेत्यांशी दानवे यांचा चांगला समन्वय होता. त्यामुळेच त्यांचे मंत्रिपद टिकल्याचे सांगितले जाते आहे.

मोदी, शहांचा विश्वास असेपर्यंत मंत्रिपदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, पक्षाध्यक्ष जे.पी. नड्डा यांचा जोवर आपल्यावर विश्वास आहे तोवर आपण मंत्रिमंडळात राहू. मोदीजींच्या दोन्ही मंत्रिमंडळात काम करण्याची संधी मला मिळाली. मोदीजींच्या नेतृत्वाखाली या खात्याच्या माध्यमातून कुणीही उपाशी राहू नये म्हणून योजना राबवल्या. कोरोनाच्या दोन्हीही लाटेत देशभरातील गरिबांना मोफत धान्य उपलब्ध करून दिले. मोदीजींचा विश्वास आहे तोपर्यंत आपण मंत्रिमंडळात राहणार आहोत. रावसाहेब दानवे, केंद्रीय राज्यमंत्री.

अशी आहे कारकीर्द
पाचव्यांदा लोकसभा सदस्य असलेले दानवे यांनी जवखेडा गावचे सरपंच ते केंद्रीय मंत्री असा प्रवास केला आहे. त्यांनी सलग दोन वेळा भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम पाहिले. यात जिल्हा परिषद ते विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत पक्षाला सर्वाधिक जागा जिंकून दिल्या. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना दानवे-फडणवीस यांच्यात उत्तम समन्वय होता त्यामुळेच पक्षाला हे यश मिळू शकले. मोदी यांच्या पहिल्या मंत्रिमंडळातही ते अन्न व नागरी पुरवठा या खात्याचे मंत्री होते. कोरोना काळात देशातील ८० कोटी लोकांना मोफत धान्य देण्याची योजना मंत्री रावसाहेब दानवे यांच्या विभागाने राबवली.

बातम्या आणखी आहेत...