आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्य:जिल्हा रुग्णालयात 7 महिन्यांत केल्या 1 हजार 13 रुग्णांवर मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया, महिनाभरापूर्वी बसवलेली फेको मशीनही महत्त्वाची भूमिका

जालना4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा रुग्णालयातील नेत्र विभागाने कात टाकली असून या ठिकाणी अद्ययावत सोयी-सुविधा व उपचार साधने बसवल्यामुळे डोळ्यांवर विनात्रास बिनटाक्याच्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया होत आहेत. कोरोना संसर्गामुळे पहिल्या व दुसऱ्या लाटेत तब्बल १७ महिने बंद असलेला हा विभाग गतवर्षी सप्टेंबरमध्ये सुरू झाला. तेव्हापासून मार्च २०२२ पर्यंत १ हजार १३ रुग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून इतरही छोट्या ५० शस्त्रक्रिया केल्या आहेत. यातच महिनाभरापूर्वी बसवलेली फेको मशीनही महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले.

केंद्र शासन पुरस्कृत राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमाच्या माध्यमातून जनजागृती, नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रियेसंबंधी रुग्णाचे समुपदेशन केले जाते. तसेच अंध व्‍यक्‍ती शोधून काढणे आणि उपचार माध्‍यमातून अंधत्‍वाचा अनुशेष कमी करणे, प्रत्‍येक जिल्‍ह्यात सर्वसमावेशक नेत्र सेवा- सुविधा विकसित करणे, नेत्रविषयक सेवा पुरवणाऱ्या साधनांची गुणवत्ता व मनुष्यबळ विकसित करणे, अंधत्‍व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत स्‍वयंसेवी संस्‍था व खासगी व्‍यावसायिकांना सहभागी करून घेत नेत्रसेवा कार्यक्रमांबाबत जागरूकता वाढवण्याच्या उद्देशाने २० खाटांचा हा नेत्र विभाग काम करत आहे. तसेच राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रम यशस्वीपणे राबवण्यासाठी राज्य आरोग्य सोसायटी महाराष्ट्र व जिल्हा सोसायटीची जिल्हा स्तरावर स्थापना करण्यात आली आहे. मात्र, कोरोना महामारीच्या काळात तब्बल दीड वर्ष या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीत खंड पडला होता. नेत्र विभाग बंद असल्यामुळे फर्निचर, लाइट फिटिंग, वातानुकूलित यंत्रणा, रुग्णांना चांगल्या सुविधा देण्यासाठी शासनाकडून निधी मिळाला. त्यातूनच अद्ययावतीकरण करण्यात आले आहे.

जिल्हा रुग्णालयातील मोतीबिंदू शस्त्रक्रियेचे वेळापत्रक : जिल्हा रुग्णालयात दर मंगळवार, गुरुवार व शनिवार असे तीन दिवस नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन केले जाते. या ठिकाणी शस्त्रक्रियेपूर्वी एक दिवस अगोदर ओपीडीत तपासणी करून झाल्यावर मोतीबिंदू शस्त्रक्रियेचे रुग्ण दाखल करून घेतले जातात व दुसऱ्या दिवशी प्रत्यक्ष शस्त्रक्रिया केली जाते. अशा पद्धतीने आठवड्यात तीन दिवस शस्त्रक्रिया शिबिर घेतले जाते.

फेको मशीनमुळे रुग्णांना दिलासा : जिल्हा रुग्णालयात महिनाभरापूर्वीच मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी फेको मशीन बसवण्यात आली असून याद्वारे ऑटोमॅटिक शस्त्रक्रिया होते. अत्यंत छोटी जखम होत असल्यामुळे रुग्णांना त्रास जाणवत नाही. येथील डॉ. जगताप यांनी गणपती नेत्रालयात प्रशिक्षण घेतले असून त्यांच्या माध्यमातून शस्त्रक्रिया सुरू झाल्या आहेत. इतर डॉक्टरांनाही प्रशिक्षण दिले जाणार आहे.

नेत्र विभागातील मनुष्यबळ असे
जिल्हास्तरावर नेत्र विभागात वर्ग १ व २ चे चार डॉक्टर तर ९ नर्सेस व २ परिचारक आहेत. तसेच ग्रामीण भागात ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर १६ कर्मचारी कार्यरत आहेत.

आज ऑपरेशन करणार : घनसावंगीत नेत्रतपासणी केल्यानंतर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करावी लागेल, असे मला सांगण्यात आले. यानुसार मी जिल्हा रुग्णालयात अॅडमिट झालो असून मंगळवारी डोळ्यांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया केली जाणार आहे. या ठिकाणी अत्यंत चांगली उपचार सुविधा आहे, अशी प्रतिक्रिया बोररांजणी येथील अर्जुन जाधव यांनी दिली.

चालू वर्षातील पहिले मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आज : जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अर्चना भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली वर्ष २०२२-२३ या चालू वर्षातील पहिले मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर मंगळवारी आयोजित करण्यात आले आहे. सोमवारी अॅडमिट केलेल्या रुग्णांवर या शिबिरात शस्त्रक्रिया केल्या जाणार असल्याची माहिती डॉ. उदयन परीतकर यांनी दिली. ठिकठिकाणी नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिरे आयोजित करून रुग्णांना नवी दृष्टी मिळवून देण्यासाठी संपूर्ण टीम प्रयत्नशील असल्याचे जिल्हा समन्वयक डॉ. संजय साळवे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...