आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी लक्षवेधी:21 पैकी दोनच रेल्वेस्टेशनवर सीसीटीव्ही, चोरट्यांचा मिळेना क्लू

जालना / लहू गाढे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद रेल्वे पोलिसांच्या हद्दीत २१ रेल्वेस्टेशन असून यात औरंगाबाद व जालना या दोनच स्टेशनवर सीसीटीव्ही आहेत. यामुळे संशयित आरोपींचे स्केच तयार करण्यासह रेकॉर्डवरील आरोपी पकडण्यासाठी रेल्वे पोलिसांना अडथळे येत आहेत. मोबाइल, दागिने, पाकीटमारी असे ९९ गुन्हे घडले. पण पोलिसांना चोरट्यांचा ‘क्लू’ नसल्यामुळे केवळ ६० गुन्हे उघड झाले. ३९ गुन्ह्यांचा तपास लोहमार्ग पोलिस करीत आहेत. रेल्वे प्रवास अधिक सुखकर होण्यासाठी बदल केले जात असून रेल्वे सक्षम बनवून जबाबदारी अधिक चांगल्या पद्धतीने हाताळण्यासाठी प्रवाशांकडूनही काही बाबतीत काळजी घेण्याची गरज आहे.

काही दिवसांपूर्वीच मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेतील एक प्रवासी डोक्याखाली मुद्देमालाची पिशवी ठेवून झोपी गेला असता चोरट्यांनी त्याची पिशवी चोरून नेली. त्यात दागिने, रोख रक्कम असा २१ लाख ९१ हजार रुपयांचा मुद्देमाल होता. या प्रकरणातील रेल्वे पाेलिसांनी आरोपींना जेरबंद केले. औरंगाबाद लोहमार्ग पोलिसांच्या अंतर्गत जालना, परभणी, नांदेड, औरंगाबाद, रोटेगाव हे स्टेशन येतात. या मार्गावरील बहुतांश स्टेशनवर सीसीटीव्ही नसल्यामुळे आरोपींना माेकळे रान मिळत अाहे. अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रलंबित गुन्ह्यांचा तपास पोलिस निरीक्षक भाले, साहेबराव कांबळे, प्रशांत गंभीरराव, एस. व्ही. भाले, हवालदार भय्या पठाण, दिलीप लोणारे, सोनाली मुंढे आदी करीत आहेत.

स्टेशनमध्ये बदल करतोय
रेल्वेस्टेशनचा विकास होत आहे. केंद्रीय बजेटनुसार रेल्वेकडून प्रत्येक स्टेशनमध्ये सुविधा वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे. आगामी काळात सर्व स्टेशनमध्ये सीसीटीव्ही बसवण्याचा प्रयत्न सुरू आहे.
रावसाहेब दानवे, रेल्वे राज्यमंत्री.

प्रवाशांनी सतर्कता बाळगावी
रेल्वे प्रवास अधिक सुखकर व्हावा, असा उद्देश आहे. भुरट्या चोरट्यांपासून प्रवाशांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. रेल्वेस्थानक परिसरात घडणाऱ्या हालचालींवर प्रवाशांनीही बारीक लक्ष ठेवावे. त्यात काही संशयास्पद आढळल्यास तत्काळ पुणे लोहमार्ग पोलिसांना त्याची माहिती द्यावी.
मोक्षदा पाटील, पोलिस अधीक्षक, लोहमार्ग औरंगाबाद.

बातम्या आणखी आहेत...