आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोरोना प्रादुर्भावामुळे सर्वत्र कडक निर्बंध लादल्यामुळे कुठलेच सण उत्सव चार भिंतीच्या आतच साजरे करावे लागले. मागील महिन्यापासून सर्व निर्बध शासनाने शिथील केल्याने भाविकांत उत्साहाचे वातावरण आहे. त्यातच पहिलाच उत्सव राम नवमीचा आल्याने जिल्ह्यभरात सर्वत्र धुमधडाक्यात रामनवमी साजरी करण्यात आली. मिरवणूक, पालखी, प्रवचन, कीर्तन, फटाक्याची आतषबाजी आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
राम जन्मोत्सवाला अंबडकरांचा उदंड प्रतिसाद
अंबड । शहरातील प्राचिन राममंदीर येथील आज झालेल्या राम जन्मोत्सवाला अंबड शहरातील लहान धोर व महिलांनी उपस्थित राहुन रामजन्मोत्सव अत्यंत उत्साहाने साजरा केला.सुधीरबुवा कोठीकर यांच्या रामजन्मोत्सव किर्तनानंतर निघालेल्या भव्य मिरवणुकीत हजारो सद्भक्तांनी तब्बल तीन तास अनवाणी सहभाग देताना अंबड शहर रामा रामा रामा रामा हो या गर्जनेने दणानुन दिले. यावेळी आमदार नारायण कुचे, अरुण उपाध्ये, सौरभ कुलकर्णी, संदीप खरात आदी उपस्थित होते. या सर्वांचा संस्थानच्या वतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी रामभाऊ दत्ताञेय देशमुख यांनी आपल्या मालकीची १२५० चौ.फूट जागा राममंदीरास दान दिली. त्यांचा सत्कार आमदार नारायण कुचे यांनी केला व त्या जागेवर लवकरच सभागृह बांधकामास निधी उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन आमदार कुचे यांनी दिले.
परतुरात सोंगाची अनेक वर्षांची परंपरा
परतूर । गेली दोन वर्ष कोरोना महामारीमुळे साधेपणाने साजरा होणारा परतूरातील श्रीराम जन्मोत्सव उत्साहात आणि पारंपारिक पध्दतीने साजरा करण्यात आला. या जन्मोत्सवाला अनेक वर्षांची परंपरा आहे. रामनवमीच्या दिवशी दुपारी १२ वाजता या ठिकाणी सोंगे सादर केली.
श्रीराम मंदिर संस्थान परतुरचा श्रीराम जन्मोत्सव सोहळ्यास अनेक वर्षाची परंपरा आहे यावर्षी सुध्दा हा जन्मोत्सव उत्साहात व पारंपारिक पध्दतीने साजरा झाला. सोंगाव्दारे रामाचा जन्मोत्सव सोहळा दृश्य रुपात भक्तासमोर दाखवला जातो ज्याव्दारे प्रत्यक्ष जन्मोत्सव सोहळा अनुभवन्याचे भाग्य आपणास लाभत असल्याची भावना काही श्रीराम भक्तांनी व्यक्त केली आहे. ईस्काँनच्या भक्तमंडळीच्या वतीने यंदा भजनाचे आयोजन करण्यात आले होते. धनंजय जोशी यांनी रामजन्माची कथा सादर केली. रामनवमीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना जिल्हा संघटक मोहन अग्रवाल यांनी राम मंदिराला १० लाख रुपये खर्च करून सभामंडप बांधून देण्याची घोषणा केली आहे. यावेळी सोहळ्यात सादर करण्यात आलेल्या सोंगात दशरथ राजांची भूमिका कांतराव देशमुख यांनी तर सुमंत प्रधान यांची भूमिका शुभम सातोनकर,वशिष्ट ऋषी प्रसाद बाप्ते,गंधर्व शिवाजी काटे,शृंगऋषी-संजय सातोनकर,कांदे महाराज-सागर नंद, रंभा-कु.आर्या कुलकर्णी तर भालदार-चोपदार श्रीपाद सातोनकर,प्रशांत डोम यांनी भूमिका पार पाडली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी गंगाधरराव पुराणिक,अरुणराव शेपाळ, सुरेश नंद, दासोपंत पुराणिक,संतोष नंद,गोविंद सातोनकर, रामराव नंद, शामराव नंद, खंडेराव कुलकर्णी, सिध्दार्थ कुलकर्णी, विठ्ठल कुलकर्णी, गजानन सातोनकर, अंजिक्य पुरी यांच्यासह आदीनी उत्सवासाठी परिश्रम घेतले. यावेळी शहरासह परिसरातील भाविकांची मोठी उपस्थिती होती.
वाटूरला विविध कार्यक्रम
वाटूर । परतूर तालुक्यातील वाटूर येथील श्रीराम मंदिरात प्रभू श्रीराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कोरोना काळापासून दोन वर्षानंतर श्रीराम जन्मोत्सव साजरा होत असल्याने राम भक्तांमध्ये मोठा उत्साह पाहण्यास मिळाला. सात दिवस रामायण, हरिकीर्तन आयोजित करण्यात आले होते. गणेश महाराज यांनी काल्याचे कीर्तनपर प्रभूश्रीरामचंद्र यांच्या कार्याला उजाळा करून दिला. श्रीराम जन्मोत्सव कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामस्थ, तरुण, छत्रपती ग्रुप, शेषशायी ग्रुपने परिश्रम घेतले.
टेंभुर्णीत ध्यानानंद महाराजांचे कीर्तन
टेंभूर्णी । श्रीराम जन्मोत्सवच्या निमित्ताने येथील श्रीराम मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने श्रीराम,लक्ष्मण व सीता मुर्तीची आकर्षक सजावट करण्यात आली. मागील 44 वर्षांपासून श्रीराम जन्मोत्सवनिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. रविवारी सकाळी १० वाजता स्वामी ध्यानानंद महाराज यांचे जन्मोत्सवचे कीर्तन झाले. आयोजित करण्यात आले होते.श्रीराम जन्मची कथा यावेळी सांगितले.अठरा पुराणात श्रीराम जन्माचे वर्णन आहे असे सांगून त्यांनी वेद,पुरानातील दाखले देत राम जन्म कथा सांगितली. धर्म रक्षवया अवतार घेसी या संत तुकाराम महाराजांच्या अभंगावर त्यांनी निरूपण केले. त्रेतायुगामध्ये अयोध्येत राजा दशरथ राज्य करीत असताना तीन बायका असतानाही पुत्र नव्हते, पायस प्रसाद यज्ञतुन निघालाआणि तो सेवन केल्याने तीन राण्यांनाहीं गर्भसंस्कार झाले, हिंदू धर्मात सोळा धर्मसंस्कार होतात. श्रीराम म्हणजे ईश्वरी तेज असल्याचे वसिष्ठ ऋषींनी सांगितले. गर्भात ९० टक्के संस्कार होते, रावण ज्ञानी भक्त पण अहंकार झाल्याने नाश झाला. असेही स्वामी धान्यानंद महाराजांनी सांगितले. यावेळी टेंभूर्णीहस परिसरातील भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
जाफराबाद बालाजी मंदिर
जाफराबाद । येथील बालाजी मंदिरात राम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी फटाक्यांची आतिषबाजीने परिसर दुमदुमला. कोरोना मुळे मागील दोन वर्ष प्रत्येक उत्सव चार भिंतीच्या आत साजरे करावे लागले. यावर्षी कोरोना निर्बंध हटल्याने प्रत्येक उत्सव धुमधडाक्यात साजरे होत आहेत. येथील बालाजी मंदिरात जवळपास शंभर वर्षापासून रामजन्म साजरा करण्यात येतो. जाफराबाद शहरातील पुरोहित मोहन मुळे यांनी रामजन्म कथा सांगितली. पुजा आरती झाल्यावर महिलांनी जन्माचा पाळणा म्हटला. त्यानंतर रामफळ, काकडी, खोबऱ्याचा प्रसाद वाटप करण्यात आला. यावेळी अनिल खंडेलवाल, जगदीश खंडेलवाल, संजय खंडेलवाल, राजेंद्र मगर, सुनील मुळे, एकनाथ घाटगे, कैलास खंडेलवाल, दत्ता देशपांडे, लामधाडे गुरुजी, वरुण देशपांडे, प्रमोद खंडेलवाल, चांदोडकर, निकलेश खंडेलवाल, गोपाल खंडेलवाल, कंचनलाल जैस्वाल, राजु जोडीवाले यांच्यासह परिसरातील भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
भोकरदन बालाजी संस्थान
भोकरदन । भोकरदन येथील संस्थान बालाजी मंदिरात रामनवमीनिमित्त राम, लक्ष्मण, सीता व हनुमान यांच्या मूर्तीची महापूजा अभिषेक करण्यात आला. यावेळी सुरेश पुराणिक यांनी रामजन्म कथेचे वाचन केले. दुपारी बारा वाजता गुलाल उधळून रामजन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी भाविकांची मोठी उपस्थिती होती. यावेळी जय श्रीरामच्या जयघोष करण्यात आला.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.