आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजालना ते राजूर २५ किलोमीटर सिमेंट रस्ता, तर राजूर ते कुंभारझरी फाट्यापर्यंत २३ किमी रस्त्याचे डांबरीकरण केले जाणार आहे. यातील जालना ते राजूर रस्त्याची निविदा काढण्यात आली असून राजूर ते कुंभारझरी फाट्यापर्यंतच्या कामाची वर्क ऑर्डरही निघाली आहे. शिवाय खड्डे भरण्याचे कामही करण्यात आले असून प्रत्यक्ष येत्या १५ ऑगस्टपासून कामाला गती येणार असून यात दुचाकी वाहनांसाठी स्वतंत्र मार्ग असणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्रीक्षेत्र राजुरेश्वराच्या भक्तांसह प्रवाशांसाठी ही आनंदाची बातमी आहे.
जिल्ह्यातील प्रमुख मार्ग असलेल्या जालना-भोकरदन रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्यामुळे वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत असत. या मार्गावर अपघाताच्या घटना घडल्यामुळे अनेक प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागले तर काहींना अपंगत्व आले. त्यामुळे या मार्गाचे नूतनीकरण करण्याची मागणी प्रवाशांमधून सुरू होती. यासंदर्भात लोकप्रतिनिधी व जिल्हा प्रशासनाकडे निवेदने देण्यात आली होती. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनीही यासाठी विशेष प्रयत्न केले. याची दखल घेत केंद्र शासनाकडून या रस्त्याच्या कामाला सहा महिन्यांपूर्वीच मंजुरी मिळाली, तर कामाच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय, तांत्रिक मान्यता मिळून निविदा प्रक्रिया राबवण्यात आल्या. पहिल्या टप्प्यात जालना ते राजूर या २५ किमी रस्त्याच्या सिमेंटीकरण कामाची निविदा नुकतीच काढण्यात आली असून राजूर ते कुंभारझरीपर्यंतच्या कामासाठी वर्क ऑर्डरही झाली आहे. शिवाय काम सुरू करण्यापूर्वी प्राथमिक मोजमाप करून रस्त्यावर जागोजागी पडलेले खड्डेही भरण्यात आले आहेत. पावसाळ्यात कामात व्यत्यय येऊ शकतो त्यामुळे हे काम पुढे ढकलण्यात आले आहे.
गणेशभक्त व शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा मार्ग
श्रीक्षेत्र राजूर येथे दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात, तर वर्षातून दोन ते तीन वेळा येणाऱ्या अंगारिका चतुर्थीला लाखो भाविकांची मांदियाळी असते. तसेच दर महिन्याला संकष्टी चतुर्थीलाही भाविकांची गर्दी होते. दरम्यान, जालना किंवा भोकरदन या दोन मार्गाने येणाऱ्या भाविकांची संख्या अधिक असल्यामुळे जालना ते भोकरदन रस्त्याच्या मजबुतीकरणाचे काम होणे आवश्यक होते. तसेच शेतमाल विक्रीसाठी नेणाऱ्या शेतकऱ्यांच्या दृष्टीनेही हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे या रस्त्याच्या नूतनीकरणाची मागणी सातत्याने सुरू होती, याला आता यश आले आहे.
राजूर ते कुभारझरीपर्यंत कामाचे दोन टप्पे, ३४ कोटींचा निधी
राजूर ते बाणेगावपर्यंत ८ किमी अंतरापर्यंत ७ मीटर रुंद, तर बाणेगाव ते कुंभारीपर्यंत १८ किमी अंतरावर १० मीटर रुंदीचा डांबरीकरण रस्ता केला जाणार आहे. गावाच्या ठिकाणी सिमेंट रोड केला जाणार आहे. या कामासाठी ३४ कोटींचा निधी मंजूर असून हे कामही २४ महिन्यांतच पूर्ण करण्याची मुदत देण्यात आली आहे.
कामासाठी २४ महिन्यांची मुदत, २९६ कोटींचा निधी
जालना ते राजूर रस्त्यासाठी शासनाकडून २९६ कोटींचा निधी मंजूर असून वर्क ऑर्डरनंतर कंत्राटदारास २४ महिन्यांत हे काम पूर्ण करावे लागणार आहे. २५ किमी लांब व ७ मीटर रुंद असलेल्या या दोनपदरी मार्गालगत दुतर्फा दुचाकीसाठी स्वतंत्र दोन मीटरचा मार्ग व दोन मीटरचे साइड पंखे असणार आहेत. अर्थात, एकूण १३ मीटरचा हा रस्ता असेल. तसेच ज्या ठिकाणी गाव असेल तेथे ७ ऐवजी १४ मीटर चौपदरीकरण केले जाणार असून यात दुभाजकही असणार आहे.
वर्क ऑर्डर होताच काम सुरू
जालना-भोकरदन या रस्त्याची टेंडर प्रक्रिया झाली असून लवकरच वर्क ऑर्डर झाल्यानंतर या कामाला प्रारंभ होईल. हा रस्ता दर्जेदार झाला पाहिजे अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. केंद्राच्या निधीतून जिल्ह्यातील रस्त्यांचे प्रश्न मार्गी लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. संपूर्ण शहराला सिमेंटचा रिंग रोड असलेले जालना हे मराठवाड्यातले एकमेव शहर आहे. ही सर्व कामे केंद्र सरकारच्या निधीतून झाली आहेत.
- रावसाहेब दानवे, रेल्वे राज्यमंत्री
केंद्रीय मार्ग निधीतून होणार या रस्त्यांचे काम
राजूर ते कुंभारझरी फाट्यापर्यंतचा रस्ता केंद्रीय मार्ग निधीतून (सेंट्रल रोड फंड) होत असून याची वर्क ऑर्डर निघून कामाला सुरुवात झाली आहे. साधारणत: १८ ते २४ महिन्यांत हे काम पूर्णत्वास जाऊन प्रवाशांसाठी हा मार्ग खुला होईल.़
- राहुल पाटील, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, जालना
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.