आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ४ डिसेंबर रोजी जालना जिल्ह्यातून जाणाऱ्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाची पाहणी केली. दरम्यान, ३ वाजून ५५ मिनिटांनी पाहणी दौऱ्याच्या ठिकाणी आले. सत्कार, हार-तुरे स्वीकारले अन् अवघ्या १९ मिनिटातच ते औरंगाबादकडे रवाना झाले. अपूर्ण, राहिलेली किरकोळ कामे तत्काळ करण्याचे गाडीतूनच अधिकाऱ्यांना आदेश देत निघून गेले.
रविवारी दुपारी समृद्धी महामार्गावरील जालना तालुक्यातील जामवाडी येथे मोटार वाहनाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आगमन झाले. या वेळी त्यांचे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी स्वागत केले. याप्रसंगी आमदार नारायण कुचे, माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे, उपविभागीय अधिकारी संदिपान सानप, भास्करराव दानवे, राजेश राऊत, अशोक पांगारकर, विष्णू पाचफुले, अभिमन्यू खोतकर, भाऊसाहेब घुगे, संजय देठे, गणेश सुपारकर आदींची उपस्थिती होती.
मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी समृद्धी मार्गाच्या नागपूर येथील झीरो पॉइंट येथून प्रवासाला सुरुवात केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः समृद्धी महामार्गावर वाहन चालवत होते. त्यांच्या बाजूला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बसले होते. जिल्ह्यातील या महामार्गाचे अंतर सुमारे ४२ किमी इतके आहे. टोल प्लाझा, इंटरचेंज असून निधोना (ता. जालना) येथे हा टोल प्लाझा, इंटरचेंज आहे. जालना व बदनापूर तालुक्यातील सुमारे २५ गावांतून हा महामार्ग जातो. ताफा आल्यानंतर नारायण वाढेकर, शेख शमशोद्दीन, शिवाजी गायकवाड, कृष्णा चव्हाण, रतन शिंदे, गौतम लांडगे यांनी काळे झेंडे दाखवून घोषणाबाजी केली. यामुळे एकच गोंधळ उडाला अन् ताफा लगेच रवाना झाला.
मुख्यमंत्र्यांविरोधात जोरदार घोषणा
मुख्यमंत्र्यांचा ताफा येताच उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले. छत्रपतींचा अवमान करणाऱ्या राज्यपाल हटावच्या जोरदार घोषणा देण्यात आल्या, तर शेतकऱ्यांची वीज कट केल्याने मुख्यमंत्र्यांविरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या आहेत. या वेळी काळे झेंडे दाखवणाऱ्यांना पोलिसांनी अडवत त्यांच्याकडील काळे झेंडे हिसकावण्यात आले.
रस्त्याव्यतिरिक्त महामार्गावर या राहणार खालील सुविधा
जालन्यातून जाणाऱ्या जामवाडी, निधोनाजवळ मदत केंद्र, तर कडवंचीजवळ रस्त्यांवरील सुविधा करण्यासाठी वेसाइड अॅमिनिटी होत आहे. अपघात झाल्यास अथवा कुणाला लुटण्याचे प्रकार होत असल्यास ४२ किलोमीटरमध्ये महामार्ग पोलिसांची तीन वाहने फिरतीवर असणार आहेत. पेट्रोल पंप, गेल गॅस पाइपलाइन, महामार्ग पोलिस मदत केंद्र, आरोग्य व्हॅन आदी सुविधाही राहिल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.