आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागोवर हा विषाणूमुळे होणारा संसर्गजन्य आजार आहे. हा आजार मुख्यत्वे ५ वर्षाखालील मुलांमध्ये आढळतो. मात्र हा आजार लसीकरणाने निश्चितपणे टाळता येतो. जालना जिल्हयात ज्या बालकांना गोवर-रुबेलाचा पहिला व दुसरा डोस दिला गेला नाही, त्यांच्यासाठी दोन टप्प्यात १५ डिसेंबर२०२२ पासून विशेष लसीकरण अभियान राबविण्यात येणार आहे. पालकांनी या अभियानाचा लाभ घेऊन आपल्या बालकांना गोवर रुबेला लसीचा डोस अवश्य द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी केले आहे.
मिझल रुबेला व नियमित लसीकरण मोहिमेबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा कृती दल समितीची बैठक पार पडली. त्यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते. बैठकीस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर, जागतिक आरोग्य संघटनेचे सल्लागार प्रतिनिधी डॉ. मुजीब सय्यद, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. जयश्री भुसारी, डॉ. अनुराधा राख, डॉ. जेथलिया आदी उपस्थित होते. प्रारंभी जिल्हाधिकारी यांनी जिल्हयातील लसीकरण मोहिमेचा आढावा घेतला.
सध्या गोवर आणि रुबेलाचे रुग्ण आढळून येत असल्याने याबाबत दक्षता घेण्याचे आवाहन करताना ते म्हणाले की, आपल्या जिल्हयात गोवर रुबेला आजाराला प्रतिबंध घालण्यासाठी लसीकरण मोहिम प्रभावीपणे राबविणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी स्वत: जिल्हा आरोग्य अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यांनी प्रभावित क्षेत्रात जाऊन प्रत्यक्ष पाहणी करावी. आशा व अंगणवाडी सेविकांना या आजाराचे गांभीर्य समजावून सांगून सर्वेक्षणासह लसीकरण मोहिम अधिक जलदगतीने राबवावी. शहर व ग्रामीण भागातील एकही बालक गोवर रुबेला लसीपासून वंचित राहणार नाही, याची खबरदारी घ्यावी. गावांव्यतिरिक्त तांडे, वाडया, ऊसतोड, खडीकरण क्षेत्र या ठिकाणचे बालक देखील लसीकरणापासून वंचित राहू देऊ नयेत. सर्व आरोग्य केंद्रांत औषधी व लसीचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवावा. लसीकरणाबाबत मोठया प्रमाणात जनजागृती करण्यात यावी. असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी या बैठकीत दिले.
९ ते २४ महिन्यांच्या बालकांना लस द्यावी राज्य शासना मार्फत प्राप्त सुचनानुसार विशेष गोवर रुबेला लसीकरण मोहिम जालना जिल्हयात डिसेंबर २०२२ व जानेवारी २०२३ या कालावधीत राबविण्यात येणार असुन या मोहिमेची पहिली फेरी १५ ते २५ डिसेंबर तर दुसरी फेरी १५ ते २५ जानेवारी २०२३ या कालावधीत नियोजित आहे. नियमित लसीकरण वेळापत्रकानुसार गोवर रुबेलाचा लसीचा पहिला डोस ९ महिने ते १२ महिने तर दुसरा डोस १६ महिने ते २४ महिने या वयात घेणे आवश्यक आहे. यानुसार एक किंवा दोन्ही डोसपासुन बालक वंचित असल्यास पाच वर्ष वयापर्यंत २८ दिवसांच्या अतंराने हे दोन डोस देता येवु शकतात. आपल्या नजीकच्या शासकीय आरोग्य केंद्रास भेट देवुन बालकाचे लसीकरण अवश्य करुन घेण्यात यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.