आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थंडीत मोठी वाढ होणार:गुजरातेतील थंड वारे दाखल झाल्याने भरली हुडहुडी, औरंगाबादेत तापमान 9 अंशावर खाली उतरले

जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गुजरातकडून थंड वारे वेगाने राज्यात दाखल झाल्याने थंडी अधिकच वाढली आहे. मागील महिनाभरातील गरमीच्या वातावरणानंतर जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यात थंडी वाढली आहे. विशेष म्हणजे कमाल तसेच किमान दोन्हीही तापमानात कमालीची घट तसेच चढउतार होत असल्याने वातावरणही झपाट्याने बदलत आहे. सोमवारी (९ जानेवारी) किमान तापमान १० अंशांवर जाणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

औरंगाबादेत तापमान ९ अंशावर खाली उतरले आहे. मात्र, उद्योगाची नगरी असलेल्या हॉट सिटी जालन्यातही थंडीचे प्रमाण तुलनेने चांगलेच राहिले आहे. बुधवारी जालन्यात तापमानाचा कमाल पारा तीन अंशांनी घसरून २७ अंशांवर पोहोचला, तर किमान तापमान १६ राहिले होते. पाणी साठवणीचे प्रकल्प तसेच बागायती परिसर असलेल्या भागात थंडी अधिक राहिली. जिल्ह्यातील आठही तालुक्यांतील तापमानात तफावत होती. जाफराबाद, भोकरदन, घनसावंगी, अंबड या तालुक्यातील तापमान जालन्याच्या तुलनेत एक ते दीड अंशाने अधिकच घसरल्याची नोंद झाली. थंड हवा तब्बल ११ किमी प्रतितासाचा वेग घेत आपल्याकडे दाखल होत आहे. यामुळे अचानक ३ जानेवारीपासून तापमानात मोठा बदल झाला. नववर्षाच्या सुरुवातीला थंडी राहणार नाही, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र, ३ तारखेनंतर वातावरणात बदल झाला. मागील दोन दिवसांपासून सूर्यदर्शन तब्बल नऊ ते साडेनऊ वाजेनंतर होत असल्याचे नागरिकांनी अनुभवले आहे. ही स्थिती पुढील पाच दिवस म्हणजेच ९ जानेवारी रोजीपर्यंत कायम राहणार असून, थंडीत मोठी वाढ होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. परिणामी सकाळी १० वाजेपर्यंत तर सायंकाळी पाच वाजेनंतर पुन्हा थंडीची चाहूल लागत आहे. यामुळे घरातही गारवा वाढत आहे. तर थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिक गरम कपड्यांच्या खरेदीकडे वळाले आहेत.

बातम्या आणखी आहेत...