आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पर्यावरण संवर्धन:चिंचखेडकर यांनी नवदुर्गा साकारून केला नारीशक्तीचा गजर

वाटूर22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गणेशोत्सव काळात प्रदर्शनीच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीची ओळख स्वतः बनविलेल्या मूर्तीतून करून देण्याची गेल्या १९ वर्षांपासूनची परंपरा प्रा. श्रीकांत चिंचखेडकर यांनी यंदाही जपली आहे. त्यांनी पर्यावरणपूरक कापूस, शाडू माती, पुठ्ठा, कागदी लगदा, गोनपाट, बांबू, खळ यांचा वापर करून मूर्तीरुपात नवदुर्गा साकारून नारीशक्तीचा गजर करतानाच, मतदान, पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला आहे.सोबतच भारतीय स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त स्वरचित मशाल या कवितेच्या माध्यमातून प्राणार्पण करणाऱ्या क्रांतिकारकांचा गौरव करत स्वातंत्र्यसंग्रामाला उजाळा दिला आहे.

जालना शहरातील गांधीचमन ते रेल्वे स्टेशन रोडवरील हरिओमनगरमधील निवासस्थानी प्रा. चिंचखेडकर दरवर्षी गणेशोत्सव ते विजयादशमीपर्यंत प्रदर्शनी लावतात. यावर्षी त्यांनी नवदुर्गा मूर्तीरुपात साकारल्या आहेत. २ दिवसापूर्वी प्रदर्शनाला सुरुवात झाली असून, सकाळी ८ ते रात्री १० या वेळेत जालनेकर प्रदर्शनी पाहण्यासाठी मोठी गर्दी करत आहेत. पर्यावरणपूरक वस्तूंपासून मुर्त्या बनविण्यापासून रंग देण्यापर्यंतचे काम प्रा. चिंचखेडकर यांनी स्वतः केले आहे. विशेष म्हणजे दुसऱ्या मजल्यावरील या प्रदर्शनी स्थळापर्यंतच्या पायऱ्या आणि भिंतीवर त्यांनी मतदान जनजागृतीचे फलकरुपी संदेश अधोरेखित केले आहेत.

भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेकांनी प्राणांचे बलिदान दिले, तुम्ही समृद्ध भारत बनण्यासाठी आपले एक मत देऊ शकत नाहीत का, असा प्रश्न त्यांनी या संदेशरुपी फलकातून विचारला आहे. एका फलकावर त्यांनी देशासाठी सदृढ तटबंदी चितारली असून, ७५ क्रांतिकारकांची छायाचित्रे त्यात तटबंदी स्वरूपात समाविष्ट केली आहेत. संस्कृतीतील पडद्याआड सामाजिक, धार्मिक, ऐतिहासिक बाबी जनतेच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रा.चिंचखेडकर यांचा प्रयत्न असतो. त्यातूनच ते दरवर्षी कलाविष्कार घडवून या संस्कृतीला उजाळा देण्याचे महत्त्वपूर्ण काम करत आहेत. हल्ली प्राणी दुर्मिळ होत चालले आहेत. ही बाब विचारात घेता, प्रा. चिंचखेडकर यांनी नवदुर्गा साकार करताना, वाघ, सिंह, गर्दप, मेंढक, नंदी ही नवदुर्गांची वाहने प्रस्तुत करून प्राणी वाचविण्याचा संदेश दिला आहे. हा देखावा तयार करण्यासाठी आपणास दीड महिने कालावधी लागला असून, संस्कृतीच्या ठेव्यांना यापुढेही जतन करण्याचा आपला प्रयत्न राहील, असे ते म्हणाले.

१९ वर्षांची परंपरा कायम
प्रा. चिंचखेडकर यांनी संस्कृतीला उजाळा देण्याचा हा छंद गेल्या १९ वर्षांपासून अखंडीतपणे जपला आहे. आतापर्यंत त्यांनी जागृत स्त्रीशक्ती (सर्व अपरिचित देवी), अमृत्सरचे सुवर्ण मंदिर, गुजरातमधील स्वामीनारायण मंदिर, स्वामी विवेकानंद स्मारक, संतमेळा, दशावतार, श्री विश्वरूप दर्शनसह कृष्णलीला, नाशिकचे काळाराम मंदिर, साडेतीन शक्तीपीठे, अष्टविनायक मंदिरे, श्रीक्षेत्र शेवगावच्या आनंदसागरचे प्रवेशद्वार महादेवाचे ९ अवतार आदी विविध प्रकारचे निर्जीव देखावे सादर केलेले आहेत.

बातम्या आणखी आहेत...