आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकरी हवालदिल:ढगाळ वातावरण, वादळाची धास्ती; कलिंगड, आंबा उत्पादक चिंतेत; तीर्थपुरी आणि परिसरात कलिंगडाची मोठी लागवड

तीर्थपुरी10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ईशान्येकडील राज्यांत आठवडादरम्यान चक्रीवादळ, तर उत्तर भारतात वादळी पाऊस येणार असल्याने हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. वरील हवामानाचा मराठवाड्यातील जिल्ह्यात थेट परिणाम जाणवणार नसला तरी वाऱ्याचा वेग वाढून आंब्याच्या कैऱ्या गळून पडण्याचा तसेच ढगाळ वातावरण राहिल्यास कलिंगड फळाला त्याचा फटका बसू शकतो असा अंदाज वर्तविण्यात येत असून त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.

मराठवाड्यात हवामान कोरडे राहणार असले तरी तीन-चार दिवसांपासून वाऱ्याचा वेग वाढत असल्याने हे अस्मानी चक्रीवादळाचे संकट आपल्या भागात येते की काय या धास्तीने तीर्थपुरी परिसरातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. दरम्यान गतवर्षी २० मार्च २०२१ दरम्यान तीर्थपुरी परिसरातील भोगगाव, मंगरूळ, मुद्रेगाव परिसरात गारपीट तर तीर्थपुरी, बानेगाव, मुरमा, कंडारी येथे वादळी पाऊस झाला होता. त्या वेळी गहू, ज्वारीसह इतर फळबागांचे नुकसान झाले होते. २ मे रोजीदेखील विजेच्या कडकडाटासह वादळी पाऊस झाला होता. त्यात कांदा बियाणे व कैऱ्याचे नुकसान झाले होते. याची आठवण शेतकरी काढत असून या वर्षीदेखील या महिन्यात अस्मानी संकट घोंगावू लागल्याने ते आपल्याकडे येते की काय अशी शेतकऱ्यांना भीती वाटत आहे. यंदा शेतकऱ्यांनी हजारो रुपये खर्चून कलिंगड, गावरान व केशर आंब्याचे पीक जोमदार आणले आहे.

आंब्याच्या कैऱ्या आता मोठ्या परिपक्व होत असून आंबा पाडाला लागून तो उतरायला येण्याच्या ऐन वेळेस वादळाने नुकसान तर होणार नाही याची चिंता शेतकऱ्यांना सतावू लागली आहे.

बातम्या आणखी आहेत...