आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:ढगाळ वातावरणामुळे तापमानात दोन अंशांनी घट, पारा 39 अंशांवर; शेतकऱ्यांना आता पावसाची प्रतीक्षा

जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जालनाजिल्ह्यात सोमवारी (६ जून) दिवसभर ढगाळ वातावरण होते. त्यामुळे तापमानात २.७ अंश सेल्सियसने घट झाली. मंगळवारी तापमान ३९ अंशांवर स्थिरावले. शनिवारी तापमानाचा पारा घसरून ३५ अंशांवर पोहोचणार आहे. सरत्या उन्हाळ्याच्या कडाक्यातून नागरिकांची काही अंशी सुटका झाली असली तरी वातावरणातील उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले असून मोठ्या पावसाची प्रतीक्षा लागली आहे.

जून महिना सुरू झाल्यानंतर वातावरणात अनेक बदल पाहायला मिळाले. मागील आठ दिवसांपासून जिल्ह्यातील वातावरणात उकाडा तर काही वेळा गारवा असे सातत्याने बदल दिसून येत आहेत. जूनच्या सुरुवातीपासून मान्सूनपूर्व पावसाची प्रतीक्षा लागली होती. मात्र पाऊस सर्वत्रच झाला नाही. उन्हाच्या उकाड्यातून हळूहळू नागरिकांची सुटका झाली. एरव्ही ४२ अंशांवर गेलेला पारा खाली आला असून मंगळवारी ३९ अंशांवर होता. दरम्यान, जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाचे वातावरण तयार होऊन कमाल तापमानात सातत्याने चढउतार पाहायला मिळत होती. जिल्ह्याच्या अनेक भागात ओलिताची सोय असणाऱ्या शेतकऱ्यांकडून ठिबक सिंचनाच्या आधारावर कपाशीची लागवड करण्यात येत आहे.

कोरडवाहू शेतकरी पेरणीपूर्व मशागत आटोपून पावसाच्या प्रतीक्षेत आहे. शेतकऱ्यांनी निव्वळ पहिल्या पावसावर पेरणी न करता पुरेशी ओल झाल्यानंतर पेरणी करावी, असा सल्ला कृषी विभागाकडून देण्यात आला आहे. पाऊस ७० ते १०० मिमी झाल्यानंतरच प्रेरणी करावी, असेही सुचवण्यात आले आहे.

आठवड्यात जोरदार पावसाचा अंदाज
हवामान अभ्यासक पंजाब डख यांच्या अंदाजानुसार ८ ते १५ जूनदरम्यान राज्यात जोरदार पावसाची हजेरी असणार आहे. या काळात दररोज भाग बदलत पावसाचे आगमन होणार आहे. ८ ते १० जूनदरम्यान विदर्भ तर १० ते १४ जून दरम्यान उत्तर महाराष्ट्र, ८ ते १० जूनदरम्यान मराठवाड्यात पावसाची हजेरी राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. यामुळे शेतकरीही पावसाच्या प्रतीक्षेत असून पेरणीची लगबग करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...