आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराष्ट्रसंत गाडगे बाबा यांनी घेतलेला स्वच्छतेचा वसा पुढे नेण्यासाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते उदय शिंदे यांनी केले.राष्ट्रसंत गाडगे बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिवर्षा प्रमाणे याही वर्षी डेबुजी परिवार आणि गुरू शिष्य परिवारातर्फे जुना जालना भागातील महालक्ष्मी मंदिरात काल मंगळवारी रक्तदान शिबिर आणि पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी जालना पीपल्स बँकेचे व्हॉईस चेअरमन परिट समाजाचे ज्येष्ठ पदाधिकारी सुभाषराव वाघमारे, प्रदेश उपाध्यक्ष मोहन इंगळे, जिल्हाध्यक्ष किशोर आगळे, सरचिटणीस अनिल खंडाळे, हिरालाल इंगळे, कृष्णा आरगडे, किशोर खंडाळे आदींची उपस्थिती होती. उदय शिंदे म्हणाले, शहरातून जाणाऱ्या नद्या १२ महिने प्रवाहित कशा राहतील यासाठी विविध सामाजिक संघटनांच्या माध्यमातून प्रामाणिक प्रयत्न केले जात आहेत.
नद्यांमध्ये वाढलेले अतिक्रमण दूर करण्याबरोबरच नदीपात्रातील गाळ काढण्याचे काम हाती घेऊन जवळपास ६५ हजार टिप्पर गाळ काढला असून या कामामुळे परिसरातील पाणी साठ्यात बऱ्यापैकी वाढ झाल्याचे शिंदे यांनी सांगितले. सदर काम करण्यासाठी सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह जिल्हा प्रशासनाने देखील पुढाकार घेतला आहे. जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, उद्योजक सुनील रायठठा, शिवरतन मुंदडा, समस्त महाजन ट्रस्टच्या विश्वस्त नूतन देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली नद्यांचे संवर्धन करण्याच्या कामात अनेकांचा हातभार लागत असून पारशी टेकडीवर सामूहिक प्रयत्नातून ६५ हजार विविध प्रजातींच्या वृक्षांची लागवड करून त्यांचे संवर्धन केले जात आहे.
या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते सामाजिक कार्यकर्ते उदय शिंदे यांना गुरू शिष्य पुरस्कार तर हिरालाल इंगळे, कृष्णा आरगडे यांना राष्ट्रसंत गाडगे बाबा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्यानंतर रक्तदान शिबिरात ७५ दात्यांनी रक्तदान केले. प्रारंभी प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.घोडके,महिला व बाल रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.राजेंद्र पाटील, सुभाषराव वाघमारे,मोहन इंगळे,गणेश सुपारकर आदी मान्यवरांच्या हस्ते संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी समाजबांधवांसह शहरातील नागरिकांची उपस्थिती होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.