आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजालना, अंबड व बदनापूर तहसीलदारांची महसूल व वन विभागाने शुक्रवारी (३ मार्च) बदली करत त्यांना एकतर्फी कार्यमुक्त केले तर या ठिकाणी रुजू होण्यासाठी परभणी, पाथरी व वसईच्या तहसीलदारांची बदली केली. यानुसार तहसीलदार श्रीकांत भुजबळ (जालना) यांच्या जागेवर परभणी येथील सामान्य प्रशासन विभागाच्या तहसीलदार छाया पवार, रमेश मुंडलोड (बदनापूर) यांच्या जागेवर पाथरीच्या तहसीलदार सुमन मोरे तर विद्याचरण कडवकर (अंबड) यांच्या जागेवर पालघर जिल्ह्यातील वसईचे अपर तहसीलदार चंद्रकांत शेळके बदलून आले असून सोमवारी ते रुजूही झाले आहेत.
संबंधितांनी ६ मार्चपूर्वी नियुक्तीच्या रुजू होणे अनिवार्य असून नवीन नियुक्तीच्या जागी कोणत्या दिनांकास हजर झाले हे शासनाला ई-मेल किंवा टपालाद्वारे कळवावे लागणार असल्याचे सहसचिव डॉ. माधव वीर यांनी म्हटले होते. त्यामुळे तिन्ही तहसीलदारांनी तात्काळ रुजू होत पदभार घेण्याची डेडलाईन पाळली. तत्पूर्वी या तहसीलदारांनी एकत्रित जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांची भेट घेतली. यावेळी जनतेची कामे वेळेत करा, असे डॉ. राठोड म्हणाले. त्यानंतर संबंधितांनी त्या-त्या तहसिल कार्यालयात जावून पदभार स्विकारला.
तिसऱ्यांदा कमबॅकची महसूलमध्ये चर्चा
तहसिलदार छाया पवार यांनी बदनापूर तहसीलदार म्हणून काम केलेले आहे. जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी त्यांना निलंबित केले होते. मात्र, निलंबन आदेशाला स्थगिती मिळवून त्या पुन्हा रुजू झाल्या होत्या. तद्नंतर त्यांची बदली करण्यात आली होती. आता त्या परत जालना तहसीलदार म्हणून रुजू झाल्या आहेत. सुमन मोरे यांनीही जाफराबाद, मंठा तहसीलदार म्हणून काम केलेले आहे. त्यानंतर त्यांचीही पाथरीला बदली झाली होती, त्या आता बदनापूरला रुजू झाल्या आहेत. तर चंद्रकांत शेळके यांनी यापुर्वी घनसावंगीत ११ महिने सेवा केली होती. तद्नंतर ते पालघरला बदलून गेले, सोमवारी त्यांनी अंबडचा पदभार स्विकारला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.