आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीक जमीनदोस्त:मान्सूनचा कमबॅक; कपाशी, साेयाबीन तगले, मका अन् ऊस पीक जमीनदोस्त

जालना25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरासह जिल्ह्यात मान्सूनने कमबॅक केले अाहे. यामुळे सुकू लागलेल्या सोयाबीन, कपाशी, मका, बाजरी, तुरीला मोठा दिलासा मिळाला आहे. काही ठिकाणी मका, उसाचे पीक आडवे झाले अाहे. काही ठिकाणी शेडनेटची नासधूस झाली आहे. यामुळे कहीं खुशी-कहीं गम अशी शेतकऱ्यांची अवस्था झाली असून, हवामान खात्याकडून पुन्हा मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवल्यामुळे शेतकऱ्यांची धाकधूक वाढली आहे.

१५ ऑगस्टनंतर पावसाने दडी मारल्यामुळे काही ठिकाणी १५ तर कुठे २० दिवसांचा खंड पडला. यामुळे ऐन फुल-शेंगात आलेले सोयाबीन पाण्याअभावी कोमेजू लागले, तर कुठे पानगळही सुरू होती. सिंचन सुविधा असलेल्या काही शेतकऱ्यांनी सूक्ष्म सिंचन, तर काहींनी मोकळे पाणी देणे सुरू केले. मात्र, विजेचा लपंडाव, त्यातच रात्रीच्या वेळी पाणी द्यावे लागत असल्यामुळे जीव मुठीत घेऊन पिकांची तहान भागवण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली होती. गत दोन-तीन दिवसांपासून ठिकठिकाणी पाऊस पडत असून रविवारच्या मुसळधार पावसाची यात भर पडली. दरम्यान, भोकरदन तालुक्यातील चिखली, धावडा भागातही जोरदार पाऊस झाला.

लखमापुरीत उसासह खरिपाचे नुकसान : अंबड तालुक्यातील सुखापुरी, लखमापुरी शिवारात शनिवारी सायंकाळी पावसामुळे पिके आडवी झाली. तसेच मोसंबीचीही मोठी फळगळ झाल्याने नवे संकट शेतकऱ्यांपुढे निर्माण झाले आहे. अनेक ठिकाणी शेतात तसेच रस्त्यालगत मोठमोठे झाडे उन्मळून पडली आहेत. विद्युत खांब वाकले आहेत. भरपाई देण्याची मागणी लखमापूरी येथील विष्णू भापकर, डिगांबर भापकर, बालासाहेब भापकर, रमेश भापकर, संजय भापकर, नारायण भापकर, अशोक गोरे, अण्णासाहेब काळे, जिजा मोताळे, नाना काळबांडे, अशोक तांदळे, शिवाजी गोरे, दौलत तारगे आदींनी केली आहे.

जालना तालुक्यात वादळामुळे शेडनेट उडाले
सिंधीकाळेगाव, रामनगर, विरेगावसह परिसरात रविवारी १५ ते २० मिनिटे झालेल्या पावसाने शेतकरी सुखावले. मात्र, बीजोत्पादनासह भाजीपाला, फळपिकांसाठी लावलेल्या शेडनेटची वादळामुळे मोठी नासधूस झाली. सिंधी काळेगाव, मौजपुरी, वानडगाव, कचरेवाडी, गोकुळवाडी, काजळा, नेर, शेवगा, उटवद, खोडेपुरी, डुकरी पिंपरी, चैतन्य नगर, बापकळ, धांडेगाव, आंतरवाला, सामनगाव, गोलापांगरी शिवारात ठिकठिकाणी पाणी साचले होते. दरम्यान, सिंधी काळेगावचे शेतकरी गणेश वाघ यांच्या शेतातील दोन शेडनेटची जाळी फाटली असून, शेतात झाडे उन्मळून पडली आहे. तर एका पानटपरीवर झाड पडल्याने नुकसान झाल्याचे ग्रा.पं. सदस्य भागवत गिराम यांनी सांगितले.

रविवारच्या शहरातील आठवडी बाजारात विक्रेत्यांसह ग्राहकांची उडाली तारांबळ
जालन्यात रविवारी दुपारी १ वाजेदरम्यान सुरू झालेली पावसाची रिपरिप दोन-अडीच वाजेपर्यंत सुरू होती. यामुळे रेल्वेस्टेशन रोडवरील रविवारच्या आठवडी बाजारात पाणीच-पाणी झाल्यामुळे भाजीपाला, फळे बेभाव विक्री करताना विक्रेते दिसून आले. एरव्ही ६० ते ८० रुपये किलो असणाऱ्या गवार, भेंडी, कारले, वांगी, कोबी, दोडकी, चवळीचा भाव प्रतिकिलो २० ते ३० रुपयांपर्यंत खाली आला होता. मिरची, कांदे, आलू, टोमॅटोच्या भावातही मोठी घसरण पाहावयास मिळाली.

बातम्या आणखी आहेत...