आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:सामुदायिक विवाहाचा 534 कुटुंबांना आधार

जालना2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुलीचं लग्न म्हटलं की गरिबांसमोर अनेक प्रश्न उभे राहतात. यासाठीच राहत सोशल ग्रुपने २१ वर्षांपूर्वी सामुदायिक विवाह सोहळ्याची संकल्पना मांडली. दिवसेंदिवस या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या माध्यमातून आजपर्यंत ५३४ विवाह झाले आहेत, तर रविवारी पुन्हा १७ जण विवाहबद्ध होत आहेत.

राहत एज्युकेशनल अँड सोशल ग्रुपच्या वतीने २००३ पासून सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले जाते. या माध्यमातून गरीब कुटुंबातील मुला-मुलींचे विवाह होतात. यात नवदांपत्यांना संसारोपयोगी साहित्यही दिले जाते. २०२१ मध्ये कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा अपवाद वगळता गेली २१ वर्षे हा उपक्रम सातत्याने सुरू आहे. या उपक्रमासाठी समाजातील विविध घटक मदत करत असतात. त्यामुळे दिवसेंदिवस चांगला प्रतिसाद मिळतो आहे असे संस्थापक अध्यक्ष शेख अफसर शेखजी यांनी सांगितले.

दरवर्षी अनोखा सत्कार
या विवाह सोहळ्याप्रसंगी दरवर्षी समाजात चांगले काम करणाऱ्या घटकांचा सत्कार केला जातो. यात कधी फायर ब्रिगेडचे कर्मचारी, कधी टपाल वाटणारे कर्मचारी, तर कधी स्वच्छता कर्मचारी अशा घटकांचा सत्कार करण्यात येतो. अशा सत्काराची ही अनोखी परंपरा राहत सोशल ग्रुपने या वर्षीही जपली आहे. या वेळेला जालना जिल्ह्याचा नावलौकिक करणाऱ्या १२ मल्लांचा सत्कार करण्यात येणार आहे.

सर्व-जाती धर्मांचे पार पडतात विवाह
अधिकाधिक गरीब कुटुंबांना या विवाह सोहळ्यात आपल्या मुलांचे लग्न करता यावे म्हणून शुक्रवारी नमाजच्या दिवशी या उपक्रमाची माहिती दिली जाते. त्यानुसार गरजू लोक राहत सोशल ग्रुपकडे नाव नोंदणी करतात. विशेष म्हणजे यात केवळ मुस्लिम समाजाचेच नाही तर कोणत्याही जाती-धर्माचे लोक आपल्या मुलाबाळांचा विवाह करू शकतात. यात मुलीचे वय १८ वर्षे आणि मुलाचे २१ वर्षे पूर्ण असले पाहिजे ही एकमेव अट ठेवली आहे.

बातम्या आणखी आहेत...