आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर आता ई-चलानद्वारे ऑनलाइन दंड केला जात आहे. हा दंड होऊ नये म्हणून काही दुचाकींवर कॅलिग्राफी केलेली इंग्रजी अक्षरे तर कुठे राखाडी रंगावर वाचताही येणार नाहीत इतका लहान क्रमांक असतो. काही दुचाकी चालक नंबरचे आकडे खाली-वर करून घोळ करून ठेवत आहेत. ई-चलानद्वारे दंड करणारे पोलिस अधिकारी नंबर प्लेटवरील क्रमांकानुसार दंड करतात. परंतु, नंबरच वेगळा असल्याने दुसऱ्याच मालकाला दंड होत आहे. मार्च महिन्यातील चार कारवायांतून हा प्रकार उघड झाला आहे. त्यामुळे आता वाहतूक पोलिस संशयित वाहनाचा चेसिस क्रमांक तपासून कारवाई करीत आहेत.
मार्च महिन्यातही शेकडो जणांवर कारवाया करण्यात आल्या आहेत. दरम्यान, काही वाहनधारक उल्लंघन केल्यानंतर वाहनांवर ऑनलाइन होणारा दंड टाळण्यासाठी नंबरमधील आकडे मागे-पुढे किंवा अस्पष्ट करून ठेवत आहेत. चेसिस क्रमांकावरून तपासले असता, अशा वाहनांचा क्रमांकच दुसरा असल्याचे समोर चार घटनांवरून आलेे आहे. ई-चलानमध्ये वाहन, चालक, उल्लंघनाचे ठिकाण, नियम उल्लंघनाचा प्रकार, चालक किंवा वाहनाच्या मालकाद्वारे पुढे कराव्या लागणाऱ्या कार्यवाहीविषयी माहिती दिलेली असते. नियमांचे उल्लंघन केल्यामुळे तुमचे ई-चलान कापले गेले तर ते तुम्हाला ६० दिवसांच्या आत भरावे लागेल. काही कारणास्तव ई-चलान भरले नाही तर सरकार किंवा पोलिसांकडून कायदेशीर कारवाई केली जाते. दरम्यान, जालना जिल्ह्यातून दोन महिन्यांमध्ये ७७ दुचाकी चोरीस गेल्या आहेत.
यात केवळ ७ दुचाकींचाच पोलिसांना तपास लागला आहे. २०२१ मध्ये ५० हजार ३८३ वाहनधारकांना १ कोटी २७ लाखांचा तर चालू वर्षातील तीन महिन्यांत १४ हजार जणांना १ कोटी ८ लाखांचा ई-चलानद्वारे दंड लागला आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक गुणाजी शिंदे, उपनिरीक्षक गणेश राऊत, राजेंद्र ठाकूर, भगवान बनसोडे, चैनसिंग खोकड, नंदकिशोर कामे, नंदकिशोर टेकाळे, विनाेद निकम आदी कारवाया करीत आहेत.
नियमांचे पालन करा
फॅन्सी नंबर प्लेटा वापरणे, दंड पडू नये म्हणून नंबर खाली-वर करणे हा गुन्हा आहे. तसेच अशी वाहने पोलिसांच्या तपासणीत अडकल्यास कडक कारवाई केली जाते. यामुळे सर्वांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे. जेणेकरून कारवाई होणार नाही.
- विनायक देशमुख, पोलिस अधीक्षक, जालना.
जालना जिल्ह्यात ३ लाख दुचाकी
जालना जिल्ह्यात ४ लाख ४२ हजार ३२९ एवढी सर्व वाहने आहेत. यात चारचाकी, तीनचाकी, जड, अवजड, प्रवासी, बसेस आदी वाहनांचा समावेश आहे. तर यात ३ लाख ५४ हजार ७५३ दुचाकी दररोज जिल्ह्यातील रस्त्यांवरून धावत असतात.
या नियमाच्या उल्लंघनावर केल्या जातात पोलिसांकडून कारवाया
विनापरवाना, कर्कश हॉर्न, आकर्षक नंबर प्लेट, मोबाइलवर बोलणे, रस्त्यात वाहन लावणे, नो पार्किंग, ट्रिपल सीट, सीट बेल्ट न वापरणे आदी उल्लंघनामुळे विविध दंड आकारण्यात येतो. एकापेक्षा अधिक वेळा नियमांचे उल्लंघन केल्यास वाढीव दंडाची रक्कम आकारण्यात येते. रस्ते अपघातांची संख्या रोखण्यासाठी ही वाढ करण्यात आली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.