आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लसीकरण:गोवरची लक्षणे आढळल्यास आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा

जालना6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गोवर हा विषाणूपासून होणारा आजार आहे. गोवर विषाणू रुग्णांच्या खोकल्याद्वारे हवेमार्फत पसरतो व संपर्कात आलेल्या व्यक्तीच्या श्वसन संस्थेतून शरीरात प्रवेश करतो. या रोगाची लक्षणे आढळल्यास घाबरून न जाता जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा व काळजी घ्यावी.सर्दी, ताप येणे, घशात दुखणे, अशक्तपणा, अंग दुखणे, शरीरावर लाल पुरळ येणे, डोळे लाल होणे, गोवरची लक्षणे आहेत.

गोवरच्या विषाणूंनी शरीरात प्रवेश केल्यानंतर सात ते दहा दिवसांनी लक्षणे दिसण्यास सुरुवात होतात. सुरुवातीस ताप व खोकला, सर्दी, डोळे लाल होणे यापैकी एक-दोन किंवा तीनही लक्षणे असू शकतात. दोन-चार दिवसांनंतर सर्व अंगावर पुरळ येणे, ते कानाच्या मागे, चेहरा, छाती, पोटावर पसरतात. त्यामुळे वेळीच काळजी घेऊन संभाव्य धोके टाळता येऊ शकतात. गोवर झालेल्या रुग्णाच्या शरीरातील अ जीवनसत्त्वाचे प्रमाण कमी होते. अ- जीवनसत्त्व कमी झाल्याने रुग्णाला डोळ्यांचे आजार व अतिसार, न्यूमोनिया, मेंदूज्वर, असे आजार होऊ शकतात.

गोवर झालेल्या रुग्णास लागोपाठ दोन दिवस अ- जीवनसत्त्वाची मात्रा दिल्यास हे आजार होण्याची शक्यता कमी असते. गोवर रोग टाळण्यासाठी लसीकरण प्रभावी मार्ग असून प्रत्येक शासकीय रुग्णालयांमध्ये लस उपलब्ध आहे. लसीकरणाच्या वेळापत्रकाप्रमाणे लसीकरण केल्यास गोवर रोग टाळता येतो. बालकांचे गोवर/रुबेला लसीकरण झाले नसेल त्यांचे लसीकरण करून घेणे आवश्यक आहे.

रुग्णांनी घ्यावयाची काळजी
बालकांना ‘अ’ जीवनसत्त्व डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार द्या. बालकांचे नियमित लसीकरण करून घ्या. गोवर साथीच्या रुग्णाच्या संपर्कात जाणे टाळा. रुग्णाने विश्रांती घेऊन हलका आहार घेणे आवश्यक. वारंवार हात साबणाने स्वच्छ धुवावेत. पिवळी फळे, हिरव्या पालेभाज्या खाणे आवश्यक. डिहायड्रेशनचे कोणतेही लक्षण असल्यास ओआरएस घ्या.

लसीचा पहिला डोस ९ ते १२ महिने पूर्ण व दुसरा डोस १६ ते २४ महिने या वयोगटातील बालकांना द्या. ताप, सर्दी, खोकला असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच औषधे द्या. दूषित हातांचा स्पर्श तोंड, नाक यांना होणार नाही, याची काळजी घ्या. बालक घेईल त्या प्रमाणात द्रव स्वरूपात अन्न द्या. गोवरची लक्षणे आढळल्यास नजीकच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा असे आरोग्य विभागातर्फे कळवण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...