आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोरोनामुळे दैनंदिन जीवनशैलीत आमूलाग्र बदल झाले असून बालकांसह वयस्कांपर्यंत सर्वच स्वच्छता, आहार व फिटनेसवर विशेष लक्ष दिले जात आहे. आरोग्य विभागाकडून केलेली जनजागृती असो की फॅमिली डॉक्टरांनी दिलेला सल्ला, याचे पालन करण्याकडे अधिक कल वाढला आहे. तर दुसरीकडे स्वत:ला वेगळे ठेवण्याची सवय लागल्यामुळे एकलकोंडेपणा वाढला असून यातून ताण येत आहे, नैराश्याला सामोरे जावे लागत आहे. मानसिक संतुलनासाठी योग, प्राणायाम, चालणे, धावणे, व्यायाम करण्याची अनेकांना सवय लागली आहे. काही जण मानसोपचारतज्ज्ञांच्या सल्ल्याने उपचार घेत आहेत. जागतिक आरोग्य दिनाच्या पार्श्वभूमीवर तज्ज्ञ डॉक्टर व अभ्यासकांशी साधलेल्या संवादातून या बाबी प्रकर्षाने पुढे आल्या.
आहार व फिटनेसवर अधिक भर
कोरोनाकाळात स्वच्छता, आहार व निरोगी आरोग्याबाबत लोक प्रचंड जागरूक झाले. भीतीपोटी का होईना, लोकांमध्ये आरोग्याबद्दल जागृती आली ही सकारात्मक बाब आहे. मात्र, कोरोनाचे निर्बंध उठताच १० टक्के लोक वगळता उर्वरित नागरिक पुन्हा पूर्वीसारखेच वागू लागले आहेत. शासनाने मास्क घालणे ऐच्छिक केले याचा अर्थ मास्क लावू नये असा नाही. घराबाहेर पडल्यावर मास्क लावावा, गर्दीत जाऊ नये, स्वच्छता पाळावी, सकस आहार घ्यावा ही प्रत्येकाची जीवनपद्धती व्हायला हवी, तरच समाज निरोगी राहू शकेल.
डॉ. संजय राख, संचालक, दीपक हॉस्पिटल, जालना
स्वत:च काळजी घ्यायला हवी
निरोगी शरीर हीच खरी संपत्ती आहे. यामुळे प्रत्येकाने आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. कोरोना महामारीदरम्यान लोकांमध्ये प्रचंड जागरूकता आली होती. प्रतिबंधात्मक असो की संसर्ग झाल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेणे, स्वत:सह कुटुंबाच्या सुरक्षेची काळजी याला प्राधान्य दिले गेले. यामुळेच कोरोनावर मात करणे शक्य झाले. मात्र, अलीकडे पुन्हा निष्काळजीपणा वाढला आहे. त्याला वेळीच आवर घालायला हवा. सध्या तापमान वाढत चालले असून उन्हात घराबाहेर पडू नये, भरपूर पाणी प्यावे, फळे खावीत.
डॉ. आशिष राठोड, जिल्हा रुग्णालय, जालना.
कोविडनंतर एकलकोंडेपणा वाढला, संवाद वाढवा
कोविडमध्ये एकलकोंडेपणा वाढला आहे. यातून चिडचिडेपणा, ताण येत असून मानसिक स्वास्थ्यावर परिणाम होत आहे. मित्र, समाजात मिसळण्यापेक्षा एकटे राहण्यावर अनेक जण भर देत आहेत. यात ज्यांना अपयश आले ते मानसिक तणावाखाली आहेत. यातून बाहेर पडायचे असेल तर संवाद वाढवावा, सण-उत्सव किंवा कौटुंबिक, सामाजिक कार्यक्रमात सहभागी व्हावे, कोणतीही समस्या असेल तर व्यक्त व्हावे, मोबाइलचा स्क्रीन टाइम कमी करावा, व्यसनापासून दूर राहावे, कुटुंबातील वातावरण चांगले राहील.
डॉ. प्रकाश आंबेकर, मानसोपचारतज्ज्ञ,
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.