आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायावर्षी कापसाला चांगला भाव मिळेल या आशेवर बहुतांश शेतकऱ्यांनी फेब्रुवारी महिना सुरू झाल्यावर देखील कापूस विकला नसल्याने घरात साठवून ठेवलेल्या कापसामध्ये किडे तयार होत असून, या पिसा किडयामुळे शेतकऱ्यांच्या घरातील सदस्यांच्या अंगाला खाज सुटण्याचे प्रमाण वाढले आहे. ग्रामीण भागात या रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांसमोर नवीन संकट उभे राहिले आहे. कापसाला जास्त भाव मिळत नसल्यामुळे विकता देखील येत नाही. तर दुसरीकडे त्यांच्यातील पिसा किडयामुळे अंगाला सुटणाऱ्या खाजमुळे कापूस घरात ठेवायलाही आता शेतकरी तयार नसल्याने शेतकरी दुहेरी अडचणीत सापडले आहेत. खाजऱ्याच्या समस्येमुळे शेतकरीही कंटाळले असून अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी या त्रासामुळे कापूस विक्री करण्यास सुरुवात केली आहे. काही शेतकरी घरात कापूस असल्याने रात्रीच्या वेळेस थंडीतही घराबाहेर झोपणे पसंत करत आहेत.
काही शेतकऱ्यांनी घरातील कापूस गोठ्यात किंवा इतरत्र ठिकाणी हलवण्यास सुरुवात केली आहे. कापसात अनेक प्रकारचे कीटक तयार झाले असून कापूस हे तंतुमय पीक आहे. त्यात नवीन कापूस घरात ठेवल्यानंतर पंधरा दिवस ते महिनाभरात हा कापूस विक्री न झाल्यास दीड ते दोन महिन्यात कापसामध्ये अनेक प्रकारचे किडे तयार होत असतात यामध्ये बोंड अळीच्या पतंगाचा समावेश आहे. त्यामुळे फार काही त्रास होत नाही मात्र कापसामध्ये डस्टी कॉटनबर्ग नावाचा किडा तयार होतो हा किडा चावल्यानंतर अंगाला खाज येऊन पुरळ उठतात.
सातत्याने त्यांच्या संपर्कात राहिल्यास हा त्रास वाढत जातो. विशेष म्हणजे लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिक व ज्यांना ॲलर्जीची समस्या आहे, अशांना या किटकांमुळे मोठ्या प्रमाणात त्रासाला सामोरे जावे लागते. यंदा कापसाला दहा हजार रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळेल या आशेवर शेतकरी आहे. परंतू दिवसेंदिवस भाव कमी होत असल्याने आर्थिक संकटांना सामोरे लागत आहे.
कापसापासून दूर झोपावे कापसातील पिसा किडयामुळे अंगावर खाज सुटत असल्याच्या रुग्णांचे प्रमाण वाढत असून यावर औषधोपचार आहेच, मात्र खबरदारी म्हणून त्यांचा त्रास वाढल्यानंतर कापसापासून दूर झोपावे. तसेच अंगावर पुरळ उठल्यानंतरही किटकांचा संपर्क कायम राहिल्यास हा त्रास वाढू शकतो, असे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. दिपक सोन्नी यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.