आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पांढरे सोने:कापसाच्या दरात 1300 रुपयांची घट; कापूस उत्पादक हवालदिल

पिंपळगाव रेणुकाई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोकरदन तालुका हा कापसाचे बिम म्हणून जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. नगदी पिक म्हणून तालुक्यातील शेतकरी दरवर्षी मोठ्या प्रमाणात कपाशीची लागवड करतात. यंदा माञ कपाशीच्या भावात अपेक्षित वाढ न झाल्याने अनेक शेतकऱ्यांच्या घरात पहिल्या वेचणीचा हजारो क्विंटल कापुस तसाच पडून असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. अनेक शेतकऱ्यांनी तर पैशाची गरज असल्याने मिळेल त्या भावात खासगी व्यापाऱ्यांकडे कापसाची बोळवण केली आहे. सुरूवातीला नऊ हजार पाचशे रूपये प्रतिक्विटंल दराने विकल्या जाणाऱ्या कापसाला पिंपळगाव रेणुकाई येथील बाजारात आठ हजार दोनशे रुपयाचा भाव मिळत आहे.

भोकरदन तालुक्यात यावर्षी सुरूवातीपासूनच पर्जन्यमान चांगले राहल्याने शेतकऱ्यांनी जवळजवळ एक लाख तीन हजार हेक्टरवर मोठा खर्च करुन खरिपाची पेरणी केली. यात ४२ हजार ३०० हेक्टरवर कपाशीची लागवड शेतकऱ्यांनी केली होती. कपाशीच्या पिकाला ऐन पाते व बोंडे लागण्याच्या काळातच पाऊस सुरू राहल्याने पाते व फुल गळण्याचे प्रकार घडले. बोंडअळीचा देखील मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला. शेतकऱ्यांनी औषधी फवारणीवर मोठा खर्च करुन रोग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. माञ परतीच्या पावसाने देखील पाऊस घरात येण्याच्या काळातच थैमान घातल्याने कापसाचे उत्पादन घटले.

विशेष म्हणजे शेतकऱ्यांनी परजिल्यातील मजुर आणुन दहा रुयपे किलो मजुरी देऊन कापुस वेचुन घरी आणला. कपाशीवर लावलेला खर्च कापुस भाववाढीतुन मिळेल या अपेक्षेने शेतकऱ्यांनी घरात कापूस साठवून ठेवला आहे. जवळजवळ दिवाळीपासुन कापुस शेतकऱ्यांच्या घरात पडून आहे. आज घडीला कापसाचे भाव प्रति क्विंटल ८ हजार २०० रुपये आहे. मागील दिवसात कापसाला ९ ते साडे नऊ हजार रुपयापर्यंत भाव मिळाला होता. परंतु त्यानंतर कापसाच्या दरात घसरणच होत गेली आहे. व्यापारी देखील वरच बाजार पडेल असल्याचे सांगत पडलेल्या भावात कापसाची खरेदी करीत आहे.

माञ अनेक शेतकरी आजही भाववाढीच्या प्रतिक्षेत आहे. माञ भाव वाढ होत नसल्याने कापसाच्या वजनात देखील फरक पडणार आहे. शिवाय अधिक काळ झाला तर कापसात पिसा देखील होण्याची भिती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. ज्या शेतकऱ्यांकडे कापुस साचुन आहे असे शेतकरी आता हवालदिल झाले आहेत. अनेक शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांची खुशामत करुन कापुस देण्यास सुरूवात केली आहे. व्यापारी देखील हाच फायदा उचलत बेभाव कापसाची खरेदी करु लागले आहे. शासनाने दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ७४ कोटी ८ लाख ७५ हजार ५८० रुपयाची मदत जाहीर केली आहे. माञ अद्यापही तालुक्यातील बरेच शेतकरी दुष्काळी अनुदानाकडे डोळे लावुन बसले आहे.

कापूस घरात पडून
बाजारपेठेत शेतीमालाला अपेक्षित भाव मिळत नसल्याने लागवड केलेला खर्च देखील निघत नाही. सध्या व्यापारी कापुस कमी भावात मागत असल्याने पंधरा क्विंटल कापुस घरात पडून आहे. कापूस विकावा तरी संकट, नाही विकावा तरी संकट अशी अवस्था आहे.
समाधान तायडे, शेतकरी, पिं. रेणुकाई

बातम्या आणखी आहेत...