आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हायरल फ्लू:खोकला, तापाने बालके फणफणली; डॉक्टर म्हणतात, हा तर व्हायरल फ्लू

जालना2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात पंधरा दिवसांपासून थंडीत वाढ झाल्यामुळे बालके सर्दी, खोकला व तापाने फणफणत असून वातावरण बदलाचा परिणाम आहे. हा कॉमन व्हायरल फ्लू असल्याने घाबरून न जाता काळजी घेत वैद्यकीय सल्ल्याने औषधोपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जात आहे. दरम्यान, बहुतांश रुग्ण बाह्यरुग्ण विभागात उपचार घेऊन बरे होत असून बोटावर मोजण्याइतक्या बालकांना आंतररुग्ण विभागात उपचारासाठी दाखल करावे लागत आहे.

डॉक्टरांच्या मते, अचानक थंडी वाढल्याने बालके आजारी पडत असून बदलत्या वातावरणाला ते नीटपणे सामोरे जात नसल्याने ही सर्दी, खोकला व ताप येत आहे. यात १ ते १२ वर्षांपर्यंतच्या बालकांचा समावेश आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठी उबदार कपडे तसेच घराबाहेर पडताना स्वेटर, टोपी, हँड ग्लोव्हज वापरल्यास थंडीपासून बचाव करता येऊ शकतो. प्रवास करताना आणखी काळजी घ्यायला हवी. मात्र काहींचे याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे बालकांना त्रास होत असून त्यांची भूकही मंदावली आहे. परिणामी वेळेवर आहार न घेतल्यामुळे बालकांमध्ये थकवा दिसून येत असून ते चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येत आहे. यासाठी काळजी घेणे व लक्षणे दिसू लागल्यास तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घेणे आवश्यक असल्याचे डॉक्टर सांगतात.

जिल्हा रुग्णालयात १२ रुग्णांवर आंतररुग्ण विभागात उपचार : जिल्हा रुग्णालयात दररोज साधारणत: ६०० हून अधिक ओपीडी असून यात १५० वर बालकांचा समावेश आहे. मात्र, यातील बहुतांश रुग्ण बाह्यरुग्ण विभागातील डाॅक्टरांच्या सल्ल्याने घेतलेल्या औषधोपचाराने बरे होत असून मोजक्याच बालकांना बालरोग वाॅर्डात दाखल करून घेऊन उपचार करावे लागत आहेत. साधारणत: ३ ते ५ दिवसांत ही बालके बरी होत अाहेत.

जिल्हा रुग्णालयात ३२ बेडचा बाल रुग्ण कक्ष : जिल्हा रुग्णालयात बालकांवर उपचार करण्यासाठी ३२ बेडचा विशेष बाल रुग्ण कक्ष स्थापन करण्यात आलेला असून सध्या या ठिकाणी १२ बालके उपचार घेत आहेत. तसेच दोन बेड हिरकणी कक्षासाठीही सज्ज आहेत.

जिल्ह्यातील गोवर-रुबेलाची स्थिती
जिल्ह्यातील गोवर संशयित १४ बालकांना व्हिटॅमिन-ए ची मात्रा देण्यात आली असून गोवर रुबेला लसीकरण सर्वेक्षणात २४५८ बालके आढळून आली आहेत. यात पहिला डोस दिलेली १४०१ तर लसीकरण न झालेली बालके १२७४ आहेत. तसेच दुसरा डोस दिलेली १०८० तर लसीकरण न झालेली ११८४ बालके आहेत. तसेच सध्या जिल्ह्यात ७९ संशयित रुग्ण असून ४ गोवर व १ रुबेला निदान झालेले रुग्ण आहेत. दरम्यान, जिल्हास्तरावर गोवर रुबेला लसीचा १२ हजार ४८५ इतका साठा आहे. गोवर उद्रेक प्रतिबंध व नियंत्रण उपाययोजनातंर्गत जिल्हास्तरीय टास्क फोर्स स्थापन करून निदान झालेल्या भागात लसीकरण सुरू आहे. यातही कुपोषित बालकांची माहिती घेऊन त्यांचे गोवर लसीकरण केले जात आहे.

गोवरमध्येही सर्दी, ताप, खोकला
विषाणूमुळे होणारा गोवर व व्हायरल फ्लूमधील काही लक्षणांमध्ये साम्य आहे. साधारणत: ५ वर्षांखालील मुलांमध्ये गोवर आढळतो. यात ताप, खोकला, वाहणारे नाक, डोळ्यांची जळजळ, सुरुवातीला चेहरा व त्यानंतर उर्वरित शरीरावर लाल व सपाट पुरळ दिसून येतात. काही मुलांमध्ये अतिसार, मध्यकर्ण संसर्ग, न्यूमोनिया, क्वचित फेफरे, अंधत्व किंवा मेंदूसंसर्ग अशी गुंतागुंत होऊ शकते. मात्र, लसीकरणामुळे हे टाळता येते. यासाठी नियमित सर्वेक्षण सुरू आहे.
- डॉ. विवेक खतगावकर, जिल्हा आरोग्य अधिकारी, जि.प. जालना

कॉमन व्हायरल फ्लू, काळजी घ्या
वातावरण बदलामुळे बालके आजारी पडत असली तरी औषधाेपचाराने लवकर बरी होत आहेत. मात्र, याकडे दुर्लक्ष करू नये, डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य उपचार घ्यावेत. तसेच बालकांना सकस व वेळेवर आहार द्यावा, उबदार कपडे वापरावेत, जेणेकरून आजारी पडणार नाही. शिवाय, बाहेरचे खाद्यपदार्थ खाणे टाळावे. - डॉ. श्याम बागल, बालरोगतज्ज्ञ, जालना

बातम्या आणखी आहेत...