आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:महाराष्ट्रात स्वतंत्र व्यापार मंत्रालय निर्माण करावे; सतीश पंच आणि दीपक भुरेवाल यांची मागणी

जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्र शासनाने ज्याप्रमाणे स्वतंत्र पाणी मंत्रालय निर्माण केले, त्याच धर्तीवर महाराष्ट्रात स्वतंत्र व्यापार मंत्रालय निर्माण करावे, अशी मागणी व्यापारी महासंघ, जालनातर्फे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात आली आहे.

उद्धव ठाकरे औरंगाबाद दौऱ्यावर असताना व्यापारी महासंघाच्या वतीने अध्यक्ष सतीश पंच आणि कार्याध्यक्ष दीपक भुरेवाल यांनी त्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्य कृषिप्रधान आहे, त्याचबरोबर व्यापार क्षेत्रासाठी संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रात सीड्स, किराणा, स्टील, डाळ, तेल इ. व्यवसायात व्यापारी मोठ्या संख्येने आहेत. तसेच महाराष्ट्र शासन व केंद्र शासनाच्या विविध करांचा नियमित व मोठ्या प्रमाणावर भरणा व्यापारी वर्ग करीत आहे. महाराष्ट्रातील व्यापारी वर्ग केवळ व्यापार करीत नसून सामाजिक बांधिलकीचे भान राखून वेळोवेळी शासनाचे निर्णय व उपक्रम राबवत आहे. कोरोना काळातदेखील व्यापाऱ्यांनी शासन निर्णयाचे काटेकोरपणे पालन करून व कोरोना आटोक्यात आणण्यासाठी योग्य ती मदत व सहकार्य शासनाला केलेले आहे.

मात्र, सर्वांना मदत करणाऱ्या व्यापाऱ्याला आपले प्रश्न, समस्या, विचार मांडण्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या मंत्रालयात स्वतंत्र व्यापार मंत्रालय नाही. महाराष्ट्रात उद्योगाचे प्रश्न मांडण्यासाठी उद्योग खाते असून आपण त्या खात्याचे मंत्री आहात. कामगारांच्या प्रश्नांकरिता कामगार मंत्रालय, शिक्षकांच्या प्रश्नांसाठी शिक्षक मतदारसंघ, पदवीधरांच्या अडीअडचणींकरिता पदवीधर मतदारसंघ व त्यांचे स्वंतत्र आमदार आहेत. केंद्र शासनानेही स्वंतत्र पाणी मंत्रालय निर्माण केलेले आहे. मात्र, व्यापाऱ्यांची संख्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर असतानाही स्वतंत्र व्यापार मंत्रालय किंवा व्यापारी आमदार नाही. व्यापार मतदारसंघ निर्माण करण्याची वारंवार मागणी झालेली असताना अद्यापपर्यंत आपण व्यापार मतदारसंघ निर्माण करण्यात असमर्थ ठरलात. त्यामुळे केंद्र शासनाने ज्याप्रमाणे स्वतंत्र पाणी मंत्रालय निर्माण केले तसेच स्वतंत्र व्यापार मंत्रालय निर्माण करावे.

व्यापाऱ्यांना त्यांच्या अडीअडचणी, प्रश्न मांडण्यासाठी हक्काचे व्यासपीठ व्हावे याकरिता महाराष्ट्रात स्वतंत्र व्यापार मंत्रालय व व्यापारी आमदारपद निर्माण करावे. व्यापारी आमदार असल्यास त्यांना प्रश्नांची जाण व माहिती असते व ते व्यापाऱ्यांचे प्रश्न चांगल्या प्रकारे मंत्रालयात मांडू शकतील. केंद्र शासनाने ज्याप्रमाणे स्वतंत्र पाणी मंत्रालय निर्माण केले, त्याच धर्तीवर महाराष्ट्रात स्वतंत्र व्यापार मंत्रालय निर्माण करावे, अशी मागणी सतीश पंच आणि दीपक भुरेवाल यांनी या निवेदनाद्वारे केली आहे.

बातम्या आणखी आहेत...