आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा:सुरक्षा साधने न पुरवल्याने‌ कंपनी मालकावर गुन्हा

जालना23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना शहरातील औद्योगिक वसाहतीत असलेल्या गीताई स्टील कंपनीत मंगळवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास भट्टी लीक होऊन स्फोट झाला होता. यात सहा कामगार गंभीर जखमी झाले होते. त्यातील एका कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. याप्रकरणी माहेश्वरी पांडे यांच्या फिर्यादीवरून कंपनी मालक व भट्टीवर देखरेख करणारा एक अशा दोघांविरुद्ध चंदनझिरा पोलिस ठाण्यात बुधवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्फोट झाल्यानंतर सहा कामगार जखमी झाले होते. त्यातील दोघे गंभीर जखमी असल्याने त्यांना औरंगाबाद येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते, तर चार कामगारांवर जालना येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. औरंगाबाद येथे उपचार सुरू असताना अजयकुमार सीताराम राजभर यांचा मृत्यू झाला, तर अन्य पाच जणांवर उपचार सुरू आहेत. ही घटना घडल्यानंतरही गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. अखेर बुधवारी रात्री माहेश्वरी पांडे यांच्या फिर्यादीवरून संशयित भट्टी मेल्टर अश्विनी राय, कंपनी मालक लालाजी विश्वकर्मा यांच्याविरुद्ध चंदनझिरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक साळवे करत आहेत.

हे पुरवले नाही साहित्य
कंत्राटदाराने तसेच कंपनी मालकाने हेल्मेट, पायातील गम बूट, चष्मा, संरक्षण कोट आदी साहित्य न पुरवल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भट्टीची देखरेख करणारा मेल्टर या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

असा झाला अपघात
सकाळी ८ ते ४ अशा शिफ्टमध्ये काम करीत असताना भट्टी एकजवळ मेंटेनन्सचे काम सुरू होते. रेमिंग मास कटल्याने भट्टी एका बाजूने लीक होऊन वितळलेले लोखंड व पाणी एकत्र आल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाफ तयार होऊन मोठा आवाज होऊन तयार झालेली वाफ काही जणांच्या अंगाला लागली. ही वाफ ठिकठिकाणी उडाली होती.

बातम्या आणखी आहेत...