आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मदतीकडे डोळे:अतिवृष्टीमुळे 3428 हेक्टरवरील पिके वाया; 6683 शेतकरी बाधित

जालना3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

यंदा जुलै-ऑगस्ट या दोन महिन्यांत अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील ३ हजार ४२८.४४ हेक्टरवरील पिके वाया गेली असून यात ६ हजार ६८३ शेतकरी बाधित झाले आहेत. यासंदर्भातील नुकसानीचा प्राथमिक अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाने विभागीय आयुक्तांना पाठवला असून प्रत्यक्ष स्थळ पाहणीचे काम सुरू असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके यांनी दिली.

जिल्ह्यात प्रामुख्याने भोकरदन, परतूर व मंठा या तीन तालुक्यात अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांना खरीप हंगामातील नुकसानीला सामोरे जावे लागले. यात काही ठिकाणी नेमकीच उगवून आलेली तर काही ठिकाणी फूट-दीड फुटांवरील पिकेसुद्धा पाण्याखाली गेली. यामुळे लागवडपूर्व मशागतीपासून पेरणी, निंदणी, खत, औषधी फवारणीपर्यंतचा खर्च वाया गेला. जमीनही पडीक राहिल्यामुळे शेतकरी हतबल झाले. त्यामुळे या नैसर्गिक आपत्तीतून सावरण्यासाठी सरकारने भरघोस आर्थिक मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत अाहे. याचाच पहिला टप्पा म्हणून महसूल, कृषी व पंचायत विभागाकडून संयुक्त स्थळपाहणी पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. तत्पूर्वी गावपातळीवर कार्यरत कृषी सहायक, तलाठी व ग्रामेसवकांकडून प्राप्त प्राथमिक माहितीवरून संबंधित तहसीलदारांनी तयार केलेला अहवाल सोमवारी विभागीय आयुक्तांमार्फत शासनाला पाठवण्यात आला आहे.

भोकरदन, परतूर व मंठा तालुक्यात स्थळ पाहणीचे काम सुरू बाधित शेतकऱ्यांना अशी मिळेल मदत जून ते ऑक्टोबर २०२२ या कालावधीत अतिवृष्टी व पुरामुळे होणाऱ्या शेतीपीक तसेच मालमत्तेच्या नुकसानीसाठी ३ हेक्टरच्या मर्यादेत वाढीव मदत देण्याचा निर्णय शासनाने घेतला असून महसूल व वन विभागाकडून तसा शासन निर्णय २२ ऑगस्ट रोजी काढण्यात आला. यानुसार जिरायती पिकांच्या नुकसानीसाठी हेक्टरी १३ हजार ६००, बागायतीसाठी २७ हजार तर बहुवार्षिक अर्थात फळपिकांसाठी ३६ हजारांची हेक्टरी मदत मिळेल.

राज्य मंत्रिमंडळाकडून १५ दिवसांपूर्वी निर्णय अतिवृष्टी, पूर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामात उपयोगी पडावे यासाठी शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान स्वरूपात एका हंगामात एक वेळेस राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून मदत देण्यात येते. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

तालुकानिहाय बाधित शेतकरी, क्षेत्र (जिरायती, बागायती व फळपिके व एकूण हेक्टर) -भोकरदन : ९५१ (७०, २०५.४४, ०.००, २७५.४४ हेक्टर) -परतूर : १९८२ (१४९१, ०.००, १६२.००, १६५३.०० हेक्टर) -मंठा : ३७५० (१४९२, ०.००, ८.००, १५००.०० हेक्टर) अशा प्रकारे एकूण ६ हजार ६८३ बाधित शेतकऱ्यांचे जिरायती, बागायती व फळपीक मिळून ३ हजार ४२८.४४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

बातम्या आणखी आहेत...