आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिके आडवी:चक्रीवादळामुळे वडीगोद्री परिसरात पिके आडवी; आमदार टोपेंची पाहणी

वडीगोद्री25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्याचे माजी मंत्री तथा आमदार राजेश टोपे यांनी वडीगोद्री, सुखापुरी व गोंदी मंडळातील चक्रीवादळाने ऊस, सोयाबीन, कापूस व मोसंबी, डाळिंबसह आदी पिकांचे ३ सप्टेंबर शनिवार रोजी सायंकाळी झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी शासनाने सरसकट पंचनामे करावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.या प्रसंगी त्यांच्याबराेबर उपविभागीय अधिकारी स्वप्निल कापडणीस, नायब तहसीलदार भालचम, गटविकास अधिकारी जमदडे, महावितरणचे कार्यकारी अभियंता यावेळी उपस्थित होते.

यावेळी आमदार राजेश टोपे यांनी अंबड तालुक्यातील शहापूर, वडीगोद्री व पाथरवला खु. या गावातील शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष बांधावर जाऊन चक्रीवादळाने नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली. वडीगोद्री, सुखापुरी व गोंदी मंडळातील चक्रीवादळाने ऊस, सोयाबीन,कापूस व मोसंबी, डाळिंबसह आदी पिकांचे पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या.तसेच शेतातील व गावठाणचे पोल पडले आहेत, तर काही मोडले आहेत. त्यामुळे अनेक गावांचा विद्युतपुरठा खंडित झाला आहे. सदरील पोल तत्काळ उभे करून विद्युतपुरठा सुरळीत करण्याच्या अधिकारी यांना सूचना दिल्या.

अंबड तालुक्यातील वडीगोद्री व सुखापुरी मंडळात शनिवारी सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे खरीप पिकासह फळबागांचे अतोनात नुकसान झाले आहे. सोयाबीनचे नुकसान झाले तर बहरात असलेल्या ऊस, तूर व कपाशी पिके वादळी वाऱ्यामुळे आडवी झाली आहेत. या आस्मानी संकटामुळे बळीराजा पुरता धास्तावला आहे.

वडीगोद्री मंडळात शनिवारी विजांच्या कडकडाट होऊन सुसाट वादळी वाऱ्यासह ५७ मिलिमीटर पाऊस पडला आहे. तर सुखापूरी महसूल मंडळामध्ये ४२ मिलिमीटर पाऊस पडला. त्यामुळे सर्वत्र शेतात पाणीच पाणी झाले आहे. वादळी वाऱ्यामुळे मोसंबीची झाडे उन्मळून पडले, तर मोसंबीची फळगळ मोठया प्रमाणात झाली आहे. परिसरात जोरदार वादळी वारे व विजांच्या गडगडटासह मुसळधार पाऊस पडला..मुसळधार पडलेल्या या पावसाने शेत शिवारात चहूकडे पाणीच पाणी वाहून लागले.तर वादळी वाऱ्यामुळे अनेक पिकांचे नुकसान झाले.

शनिवारनंतर रविवारीही पावसाचा बसला तडाखा फळबागांचा जिल्हा म्हणून जालन्याची ओळख आहे. मोसंबी, डाळिंब, द्राक्ष आदी फळपिकांचे ही अतोनात नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे मोसंबी व डाळिंब फळांची मोठ्या प्रमाणात फळगळ झाली आहे. अनेक ठिकाणी उसाचीही पडझड झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात आहे. सोयाबीन, बाजरी व मक्का पिकांच्या ऐन बहराच्या वेळी वादळी वाऱ्याने रौद्ररूप धारण केल्याने सर्वच नगदी पिके आडवी झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. परत रविवारी सायंकाळी वादळी वारे व मुसळधार पावसामुळे परत शेत शिवारात पाणीच पाणी झाले. त्यामुळे शेतकरी चिंतातुर झाला आहे. प्रशासनाने वडीगोद्री, धाकलगाव, पिठोरी सिरसगाव, शहापूर, दाढेगाव, सुखापुरी व लखमापूरी आदी परिसरात झालेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल.

बातम्या आणखी आहेत...