आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मौत का कुआँं:जालन्याजवळ विहिरीत पडली कार; कारच्या बाहेर फेकून आईने वाचवला चिमुकलीचा जीव

जालना19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दोन दिवसांत विहिरीने घेतले ४ बळी, पती-कारचालक बचावले

रविवारी सकाळी ६.३० ची वेळ. पती-पत्नी आपल्या दोन मुलींसह कारमध्ये शेगावला निघाले होते. दीड वर्षाची चिमुकली आईच्या कुशीत बसली होती. देऊळगावराजा रस्त्यावर जामवाडीनजीक अचानक वळणावर असलेल्या विहिरीत कार पडणार हे लक्षात येताच क्षणार्धात त्या माउलीने आपल्या जिवाची पर्वा न करता मुलीला पटकन कारबाहेर फेकले आणि ती स्वत: मृत्यूच्या कराल दाढेत गेली. कार थेट विहिरीत जाऊन पडली. यात आईसह थोरली ४ वर्षांची मुलगी ठार झाली, तर पती, चालक आणि दीड वर्षाची चिमुकली बचावली. अंगावर शहारे आणणारा हा हृदयद्रावक अपघात जालना जिल्ह्यात घडला.

दोनच दिवसांपूर्वी शुक्रवारी रात्री याच विहिरीत पडून बीड येथील दोघांचा मृत्यू झाला होता. आरती गोपाल फांदडे (३०), माही गोपाल फांदडे (४) अशी मृतांची, तर गोपाल विठ्ठल फांदडे (सिंगडोह, ता. मानोरा, जि. वाशीम), वेदिका गोपाल फांदडे (दीड वर्ष), जय गुणवंत वारखेडे (१७, देवठाणा, ता. मानोरा, जि. वाशीम) अशी जखमींची नावे आहेत. औरंगाबादहून हे कुटुंब शेगावला निघाले होते. ते मूळचे वाशीमचे रहिवासी आहेत. जामवाडीजवळील युवराज हॉटेलजवळील रोडच्या कडेला असलेल्या या विहिरीत ती कार गेली. चालक व महिलेचा पती असे दोघे पोहून बाहेर आले. माय-लेकींचे मृतदेह मात्र पाण्यातून काढण्यात आले.

कार विहिरीतून बाहेर काढताना. छाया : किरण खानापुरे
कार विहिरीतून बाहेर काढताना. छाया : किरण खानापुरे

औरंगाबादहून शेगावला दर्शनासाठी जाताना जामवाडीजवळ अपघात

जालना शहरातील बायपास मार्गावरील एका खासगी हॉस्पिटलमध्ये जखमी दीड वर्षाच्या मुलीवर उपचार केले जात आहेत, तर पाण्यातून बाहेर आलेले चालक व त्या मुलीचे वडील यांची प्रकृती चांगली आहे. हे सर्वजण शेगाव येथील गजानन महाराजांच्या दर्शनासाठी जालन्याहून कारने (एमएच २१ व्ही ७८८७) जात होते. गोपाल फांदडे हे औरंगाबादेतील वाळूज येथे एका खासगी कंपनीत काम करून वाळूज परिसरात राहत होते, अशी माहिती उपनिरीक्षक वडते यांनी दिली.

परिसरातील दोघांनी मुलीला वाचवले

सकाळी हा अपघात जेव्हा झाला तेव्हा दोघे तेथून जात होते. कार विहिरीत जात असताना मोठा आवाज झाला. त्यांनी लगेच विहिरीजवळ धाव घेतली तेव्हा कार आत पडल्याचे पाहून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. मदत करावी तरी कशी हे कळेनासे झाले. आजूबाजूचे ग्रामस्थही तेथे जमले. तितक्यात विहिरीच्या शेजारी असलेल्या मोकळ्या जागेतून बाळ रडण्याचा आवाज येत होता. जवळ जाऊन पाहिले तर काट्यांमध्ये एक बाळ दिसले. वेदनेने ते विव्हळत होते. प्रत्यक्षदर्शी अशोक पवार व तौफिक अली यांनी तत्काळ बाळाला उचलले. तोपर्यंत पोलिस आणि ग्रामस्थ जमले होते. त्यांनी बाळाला जालन्याला रुग्णालयात हलवले. त्यानंतर घाटीत त्या बाळावर उपचार करण्यात आले.

जामवाडीच्या ग्रामस्थांचा ४ तास रास्ता रोको

अपघातानंतर जामवाडीच्या संतप्त गावकऱ्यांनी महामार्ग चार तास रोखून धरला. तब्बल चार तास चाललेल्या या रास्ता रोको आंदोलनामुळे देऊळगावराजा व जालना या दोन्ही मार्गाकडून वाहतूक कोंडी झाली होती. नंतर पोलिस निरीक्षकांनी ग्रामस्थांचे निवेदन स्वीकारून रस्ता मोकळा केला.

घटनास्थळावर बघ्यांची गर्दी : रास्ता रोको वेळी अनेक वाहने खोळंबल्याने प्रवाशीही घटनास्थळी येऊन पाहणी करीत होते. यामुळे घटनास्थळी चांगलीच गर्दी झाली होती. या रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी, संबंधित ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थ करत होते. या वेळी प्रशांत वाढेकर, सरपंच सुधाकर वाढेकर, नारायण वाढेकर यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...