आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:जिल्ह्यात 36 हजार 958 हेक्टरवर तृणधान्याची लागवड

जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

वर्ष २०२३ हे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष घोषित केले असून पोषक धान्यांच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाने अपेडा या कृषी निर्यात प्रोत्साहन संस्थेच्या माध्यमातून भारतीय भरडधान्यांच्या निर्यातीला जगभर आणखी प्रोत्साहन देण्यासाठी उपयुक्त धोरण तयार केले आहे. यात प्रामुख्याने नाचणी, ज्वारी व बाजरी पिकांचा समावेश असून या पिकांच्या लागवडीसाठी शेतकऱ्यांमध्ये कृषी विभागाकडून व्यापक जनजागृती केली जात आहे. तसेच भरडधान्यातील पोषणमूल्ये व आहारातील महत्त्व पटवून देत देश-परदेशात बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठीही प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान, जालना जिल्ह्यात ३६ हजार ९५८ हेक्टरवर तृणधान्याची लागवड असून यात वाढ होण्यासाठी कृषी विभागाची यंत्रणा शेतकऱ्यांना प्रोत्साहन देत आहे.

नूडल्स, बिस्किटे, तयार पदार्थ, मिठाई यासारख्या रेडी टू ईट आणि रेडी टू सर्व्ह श्रेणीतील पोषण-मूल्यवर्धित उत्पादनांच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार स्टार्ट-अप्सनादेखील एकत्रित करत आहेत. जालन्यासह मराठवाडा, विदर्भासह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत यातील ज्वारी, बाजरी, राजगिरा आदी पिके घेतली जातात.

यातील ज्वारी, बाजरी ही पिके खरीप व रब्बी दोन्ही हंगामात येतात. राजगिरा प्रामुख्याने रब्बीत घेतला जातो. यातही मराठवाडा-विदर्भ हा दुष्काळी पट्टा असल्यामुळे व पुरेशा सिंचन सुविधा नसल्याने हंगामी पिकांवर शेतकऱ्यांचा अधिक भर असतो. यामुळे फळ बागायतदारच नव्हे तर हंगामी पिके घेणारे शेतकरीसुद्धा आपला शेतमाल देश-परदेशात नेऊन विक्री करू शकतात. त्यातून अधिक नफा मिळवू शकतात. यामुळे शासनाने २०२३ हे तृणधान्य वर्ष म्हणून साजरे करण्याचा निर्णय घेतला असून यासाठी गावागावात जनजागृती केली जात आहे.

गुणवत्तापूर्ण उत्पादन घेतल्यास भावही चांगला
जालना जिल्ह्यातील तृणधान्याची सरासरी लागवड ७१ हजार २० हेक्टर २५ आर असून २०२२ मध्ये एकूण ३६ हजार ९५८ हेक्टरवर तृणधान्याची लागवड झालेली आहे. यात प्रामुख्याने ज्वारी, बाजरी, मका आदी पिकांचा समावेश असून शेतकऱ्यांनी गुणवत्तापूर्ण उत्पादन घेतल्यास त्यास बाजारात भावही चांगला मिळतो. - भीमराव रणदिवे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जालना.

तृणधान्याचे आहारातील महत्त्व सांगताहेत आहारतज्ज्ञ वसुधा पिंगळे
बाजरी :
कॅल्शियम, व्हिटॅमिन ए, बी व फॉस्फरस अधिक प्रमाणात उपलब्ध असून लोह, फोलेट व मँगनीजचीही उपलब्धता आहे. आहारात बाजरीचा समावेश केल्याने रक्तातील मेद नियंत्रित होते, रक्तदाबासाठी उपयुक्त आहे.

ज्वारी : तंतुमय पदार्थ, थायमिन, रायबोफ्लेविन, फोलिक अॅसिड, कॅल्शियम, लोह, झिंक, सोडियम, फॉस्फरसने समृद्ध असलेली ज्वारी हृदयविकारावर उपयुक्त असून स्थूलता, संधिवात यावरही परिणामकारक आहे. गर्भवतींसाठी आवश्यक खनिजे व जीवनसत्त्वांची उपलब्धता यात आहे.

नाचणी : यात लोह, झिंक, सोडियम, फॉस्फरस व बिटा कॅरेटिन असते. प्रथिने, व्हिटामिन ए, तंतुमय पदार्थांनी युक्त, अॅमिनो अॅसिड व कॅल्शियमची उपलब्धता अधिक असते. नाचणी आतड्यांच्या कर्करोगावर उपयोगी असते. कोलेस्टेरॉलचे प्रमाण नियंत्रित करते, बद्धकोष्ठतेसाठी फायदेशीर असून प्रथिनांमुळे कुपोषणावरही मात देता येते. मधुमेहींसाठीही लाभदायक आहे.

बातम्या आणखी आहेत...