आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादीड कोटी रुपयांचा खर्च करून जालना शहरातील मोती तलावाच्या बाजूला असलेल्या ३२ एकर परिसरात ३३ हजार वृक्ष लावून अमृतवन तयार करण्यात आले. यामुळे हा ऑक्सिजन पार्क बहरला होता. परंतु, मध्यंतरीच्या काळात काही कंत्राटदारांनी थातूरमातूर देखभाल करून नुसती बिले उचलली. यामुळे हे अमृतवन कुपोषित झाले होते. चार वर्षे उलटूनही या ठिकाणी जॉगिंग, सायकलिंग, पॅगोडा पार्क झाले नाही. दरम्यान, मागील चार महिन्यांपासून नवीन कंत्राटदार नेमण्यात आला. चार वर्षांत दाेन कंत्राटदार बदलले. झाडे जळालेल्या ठिकाणी आता पुन्हा नवीन २० हजार झाडे लावण्यात आली आहेत. या वृक्षांना नव्याने ठिबक सिंचन केले आहे. दररोज ३० लाख लिटर फिल्टरचे पाणी दिले जात आहे.
हे वृक्ष जगवण्यासाठी आता वर्षाला नगरपालिकेला वीस लाखांचा खर्च करावा लागणार आहे. केंद्र शासन पुरस्कृत अमृत अभियानांतर्गत जालना शहरातील श्री छत्रपती संभाजी उद्यानाच्या बाजूला असलेल्या परिसरात ३० हजार वृक्षांची लागवड करण्यात आली. शासनाकडून प्रत्येक शहरात हरित क्षेत्र विकास करण्याच्या अनुषंगाने झाडे लावण्यात येत आहेत. शहराच्या बाजूला अमृतवन तयार करून त्या ठिकाणी नागरिकांना फिरण्यासाठी वापर केला जावा, अशी संकल्पना आहे. दरम्यान, जालना शहरातही असे उद्यान तयार झाले आहे. या परिसरात तब्बल तीस हजार वृक्ष लावले. वन उद्यानाच्या चारही बाजूंनी जाळ्यांचे कंपाउंड केले आहे. झाडांना पाणी देण्यासाठी ठिबक सिंचनही केले होते. परंतु, लागवड झाल्यानंतर याकडे दुर्लक्ष झाल्याने या उद्यानाची अवस्था बकाल झाली होती. अनेक झाडांची चोरी झाली. ठिबक सिंचनाच्या नळ्या, पाइप हेसुद्धा चोरून नेले. अनेक झाडेही जळाली होती. आता चार महिन्यांपासून कंत्राटदार बदलण्यात आला असल्याने या ऑक्सिजन पार्कमध्ये आता पुन्हा हिरवळ होऊ लागली आहे.
वृक्षांना फिल्टरचे पाणी
लागवड करण्यात आलेल्या वृक्षांना शुद्ध पाणी देण्यासाठी या ठिकाणी चार फिल्टर लावण्यात आलेले आहेत. यात दररोज ३० लाख लिटर पाणी दिले जात असल्याची माहिती या वनाची देखभाल करणाऱ्यांनी दिली आहे.
२४० जातींची झाडे
अमृतवनात मोहगिरी, लिंब, पिंपळ, वड, उंबर, गुलमोहर, सिसम, जांभूळ, पेरू, चिकू, अंजीर, फणस यासह फुलपाखरांसाठी फुलांचीही लागवड करण्यात आली आहे. पक्ष्यांचा वावर राहावा, यासाठी फळांची झाडे लावण्यात आली आहेत. तर, पक्ष्यांना घरटे करुन राहता यावे या उद्देशाने बांबूची लागवडही मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे.
चार महिन्यांपूर्वीच आले आमच्याकडे कंत्राट
अमृतवनातील झाडे जगवण्यासाठी तसेच घनदाट जंगल होण्याच्या दृष्टीने नव्याने २० हजार वृक्षांची झाडे लावण्यात आली आहेत. तुटलेले कुंपण पूर्णपणे बंद केले. नव्याने ठिबक लावून झाडे जगवली जात आहेत. - डॉ. संजय दळे पाटील, व्यवस्थापक अमृतवन, जालना.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.