आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजीवनाश्यक वस्तू, वीज दर आणि खाद्यतेल दरवाढ पाठोपाठ आता घरगुती वापराचे गॅस सिलिंडरचे दर पुन्हा ५० रूपयाने महागले आहेत. त्यामुळे महागाईचा भडका उडाला आहे. घरातील खाणे पिणेही महागले आहे. त्यामुळे सरकारविषयी तीव्र संताप व्यक्त होत असून बहुत हुई मंहगाई की मार, अब की बार नया विचार अशा पोस्ट सोशल मिडियात फिरत आहेत. भोकरदन तालुक्यात रोजगार सहज सुलभतेने उपलब्ध होत नसल्याने उदरनिर्वाहासाठी औरंगाबाद, पुणे, मुंबई येथे जावे लागत आहे. खरीप हंगामातील शेती हा मुख्य व्यवसाय असून कष्टकरी, शेतकरी यांचा मोठा भरणा आहे. सर्वसामान्य नागरिकांना रोजगार म्हणून २०० रू ते ४०० रूपये मिळतात. तर महिलांना २०० रू मजुरी मिळते.
खाद्य तेल १८० रुपये किलो झाले आहे. कमवावे किती आणि खावे किती असा बिकट प्रश्न उभा राहिला आहे. इंधन दरवाढीची त्यात आता भर पडली आहे. इंधन दरवाढीमुळे सर्वच वस्तूंच्या किंमती आकाशाला भिडल्या आहेत. चांगली ज्वारी ४ हजार रुपये क्विंटल गहू ३ हजार रुपये क्विंटल, तांदूळही २ हजार रुपये क्विंटल लाल मिरची २५० रुपये किलो झाली आहे. यातच भरीस भर म्हणजे गॅस सिलिंडर पुन्हा ५० रूपयाने महागले आहेत.
आता सिलिंडर १ हजार १३० रुपयाना मिळणार आहे. काहीच सबसिडी मिळत नाही. सर्वसामान्य नागरिक आर्थिक दृष्टया मागास अवस्थेत जीवन जगत असून महिन्या काठी संसाराचा गाडा हाकताना नकी नऊ येत आहेत. महिलांचे घरातील बजेट कोलमडले आहे. ज्या पटीने भाववाढ होत आहे त्या पटीने मजुरी आर्थिक उत्पन्न वा शेतमालाचे भाव वाढत नाहीयेत. त्यामुळे गरीब आणि श्रीमंत वर्गात आर्थिक विषमता वाढत आहे.
गरिबाचे जगणे कठीण
यापूर्वीही महागाईच्या झळा काही कमी बसत नव्हत्या. यातच गॅस दर वाढवून सरकारने भडका उडविला आहे. पालेभाज्या महाग, धान्य महाग, दूध महाग यामुळे गरिबांनी जगायचे तरी कसे? गरिबांचे जीवन जगणेच आता कठीण झाले आहे. सरकारने गॅस दरवाढ मागे घ्यावी व सर्वसामान्य कुटुंबाला जगण्यासाठी आधार द्यावा. - छाया सोनुने, गृहिणी
आर्थिक बजेट कोलमडले
गॅस दरवाढीने अकराशे रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे पुन्हा चूल पेटविण्यास सुरुवात करावी लागणार आहे. ग्रामीण भागात सरपण ५ रुपये किलोप्रमाणे मिळत आहे. तसेच या घडीला शेतातही लाकूडफाटा मिळणे मुश्कील झाले आहे. परिणामी, महिलांचे आर्थिक बजेट कोलमडणार आहे.- निर्मलाबाई लोखंडे, गृहीणी
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.