आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभोकरदन तालुक्यात शासनाकडून खरिपातील दुष्काळ मदत जाहीर करुन तब्बल तीन महिन्याच्या वर कालावधी उलटून गेला आहे. मात्र अद्यापही शेतकऱ्यांना मदतीचा खडकु देखील पदरात पडलेला नाही. याबाबत तालूका प्रशासनाकडून शेतकऱ्यांना मदत लवकर मिळण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे महसुल खात्याने सांगितले जात असले तरी प्रशासनाकडून मदतीची तारीख पे तारीख मिळत असल्याने मायबाप सरकार आणखी किती दिवस मदतीची वाट पहावी लागणार अशी भावनिक सादच तालुक्यात शेतकऱ्यांनी शासन दरबारी घातली आहे. खरिपाप्रमाणे रब्बीत देखील निसर्ग शेतकऱ्यांच्या पाठीशी हात धूवून लागला असल्याने शेतकरी परेशान झाले आहेत. यंदा भोकरदन तालुक्यात पावसाने वार्षिक सरासरी ओलाडंली.शिवाय पेरणीनंतर पावसाने काही दिवस सततधार लावुन धरल्याने कोवळी पिंकाचे काही प्रमाणात नुकसान झाले. तरीही शेतकऱ्यांनी खताचे व औषधांचे महागडे डोस देत पिके हातात आणली. अपेक्षित पर्जन्यमानामुळे खरिप हंगामातील पिके चांगलीच बहरली होती. परिणामी चांगले उत्पादन यंदा हाती लागणार म्हणून शेतकरी समाधानी होते.
परंतु दरवर्षी प्रमाणे यंदा देखील निसर्गाने शेतकऱ्यांना हात दाखवित सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात पावसाने धुमाकुळ घातला हाेता. सातत्याने झालेल्या पावसाने खरिप पिकाचे मोठे नुकसान झाले. अनेक भागात जमिनीत पाणी साचल्याने सोंगणी केलेले सोयाबीन पिके पूर्णतः वाया गेली. पिके पिवळी पडून त्यांची वाढ खुटली. शिवाय वादळी वाऱ्यात शेकडो हेक्टरवरील मका पिक जमिनीवर आडवे झाले. तर कपाशीच्या शेतात पाण्याचे डोह साचले. त्यामुळे कपाशीच्या केर्या देखील काळवडंल्या. पिके ऐन घरात येणाच्या काळातच निसर्गाने घात केल्याने शेतकऱ्यांचे कधी न भरुन निघणारे नुकसान झाले. शिवाय अधिक पावसामुळे शेतकऱ्यांचे नगदी पिक म्हणून ओळखल्या जाणारे मिरची पिक देखील पूर्णतः उद्ववस्त झाले. त्यामुळे नुकसान झालेल्या पिकाचे त्वरीत पंचनामे करुन शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्याची मागणी झाली. शासनाने नुकसानीचे पंचनामे करण्याचा सुचना महसुल व कृषी विभागातील अधिकाऱ्यांना दिल्या होत्या.त्यानुसार कृषी व महसुल विभागातील अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जात पंचनामे करुन सदर अहवाल शासनाकडे सादर केला होता. शासनाने दखल घेत भोकरदन तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी ७४ कोटी ८ लाख ७५ हजार ५८० रूपये मंजुर केले.
या अनुदानाचा लाभ तालुक्यातील ६३ हजार ६५४ शेतकऱ्यांना मिळणार आहे. मात्र शासनाने मदत जाहीर जवळजवळ तीन महिन्याचा वर कालावधी लोटला असला तरी शेतकऱ्यांच्या खात्यात अद्यापही ही मदत वर्ग झाली नसल्याने शेतकरी संताप व्यक्त करीत आहे. संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत विचारणा केली तर ते मदतीची प्रकीया सुरू असल्याचे ते सांगत आहे. यंदा खरीपात शेतकऱ्यांच्या हाती काहीच लागले नाही.त्यामुळे रब्बी शेतकऱ्यांनी उसनवारी करुन पूर्ण केली. त्यातही मागील काही दिवसापासून तालुक्यात बहुतांश ठिकाणी वादळी वारा व अवकाळी पावसात शेतकऱ्यांचे नुकसान झाले असल्याने नैसर्गिक संकटामुळे शेतकरी हतबल झाले आहे. याकडे शासनाने गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे.
संकटाची मालिका
भोकरदन तालुक्यात शेतकरी आणि संकटे हे समिकरण दरवर्षी जुळत असल्याने शेतकरी घायघुतीला आले आहेत. शेती मालाला बाजारात अत्यल्प भाव असल्याने तो देखील विक्रीविना अद्यापही घरातच पडून आहे. कपाशीत पिसा झाल्या असल्याने घरात आरोग्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे कुटुंबात तंटे व वाद वाढले आहे. आता रब्बीत देखील हरभरा, गहु, मकाचे भाव पडले असल्याने शेतकरी आर्थिक कंगाल होऊ लागल्याचे चित्र या परिसरात दिसून येत आहे.
शासनाने लक्ष द्यावे
अतिवृष्टीचा पाऊस झाल्याने खरिपात प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर केली खरी माञ अद्यापही मदत शेतकऱ्यांच्या पदरात पडली नसल्याने आणखी किती दिवस मदतीची वाट पहावी लागणार हा प्रश्न आहे. रब्बीत देखील नैसर्गिक संकट शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयार नाही.यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. - राम मयुरे, शेतकरी, पिंपळगाव रेणुकाई.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.