आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृत्यू:लसीकरणानंतर सहा तासांनी दोन महिन्यांच्या बालकाचा मृत्यू

जालना25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

लसीकरणानंतर सहा तासांनी बदनापूर तालुक्यातील हिवरा राळा तांडा येथील दोन महिन्यांच्या बालकाचा जालना शहरातील एका खासगी रुग्णालयात बुधवारी सायंकाळी ६ वाजेदरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी चुकीच्या पद्धतीने लस दिल्यामुळे बालकाचा मृत्यू झाल्याचा आरोप बाळाच्या नातेवाइकांनी केला असून दोषींवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. तर, मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदनानंतरच समोर येईल, अशी भूमिका घेत प्रकरणाची जिल्हास्तरीय पथकाकडून चौकशी करण्याचे आश्वासन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर विवेक खतगावकर यांनी दिले आहे. यातील दोन महिन्यांच्या बालकास बुधवारी सकाळी ११ वाजेदरम्यान विविध पाच प्रकारच्या लसी देण्यात आल्या, यातील तीन इंजेक्शनमधून तर दोन लसी तोंडावाटे दिल्या. काही वेळाने बाळ झोपी गेले. मात्र सायंकाळी उशिरापर्यंत ते उठलेच नाही.

या वेळी बाळाच्या नाका - तोंडातून पाणी येऊ लागले म्हणून नातेवाइकांनी तातडीने जालना येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये त्याला उपचार करण्यासाठी दाखल केले. या वेळी डॉक्टरांनी तपासून बाळ मृत झाल्याचे सांगून शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात घेऊन जाण्याचे सांगितले. त्यानुसार बुधवारी रात्री जिल्हा रुग्णालयात मृतदेह आणण्यात आला व दुसऱ्या दिवशी गुरुवारी सकाळी तज्ज्ञ डॉक्टरांनी शवविच्छेदन केले. या वेळी उत्तरीय तपासणीसाठी काही अवयव काढून ते औरंगाबाद येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असून येत्या तीन दिवसांत याचा अहवाल प्राप्त होईल.दरम्यान, आरोग्यसेविकेमार्फत एकूण सात जणांना लस देण्यात आली असून यातील सहा जणांची प्रकृती ठणठणीत आहे.

बातम्या आणखी आहेत...