आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापूजा, अर्चना तसेच विविध प्रकारचे पान बनवण्यासाठी हिरव्या खान्याच्या पानांचा वापर केला जातो. घरातील ज्येष्ठ आजी-आजोबा यांना याची विशेष आवड आहे. यासाठी जालना जिल्ह्याला आठवड्याला जवळपास ४० लाखांवर पाने लागतात. या पानांची संख्या ही कोरोनापूर्वी अधिकच होती. मात्र कोरोनानंतर पानांची मागणी आठवड्याला तब्बल २०० टोपली म्हणजेच ५० हजाराने कमी झाली आहे.
जालन्यातील मा. कृष्णराव फुलंब्रीकर नाट्यगृहाच्या बाजूला मागील ५० वर्षांपासून पान बाजार भरवला जातो. सकाळी ८ ते १० या वेळेत आठवड्यातील दोन दिवस शनिवार आणि मंगळवार असा दोन दिवस हा बाजार भरतो. आठवड्यात यामध्ये हजार ते दीड हजार टोपल्या एकात २५०० पाने असलेली दाखल होतात. तर यासाठी जालना तसेच बदनापूर, अंबड, घनसावंगी, परतूर येथील व्यापारी लिलाव करण्यासाठी दाखल होतात. आठवड्यात एकावेळी दाखल झालेला व्यापारी आठवड्याची खरेदी एकदाच करतो.
मागील अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या पानांच्या बाजारात आडत व्यापारी म्हणून दिलावर खॉ मुनाबर खॉ, अजित आहेर, मुहम्मद उस्मान यांचे नाव घेतले जात. त्यानंतर त्यांची पुढील पिढी ही वडिलोपार्जीत व्यवसाय करण्यासाठी पुढे आली ज्यात मुख्य व्यापारी म्हणून यासिन सुलतान तांबोळी, गुलाब खॉ फते खॉ, अहमद अब्बास तांबोळी, नासीर शेख बशीर, शेख मेहबूब, सय्यद जिलानी सय्यद अब्दुल कादर बाबामिया हे काम पाहत आहेत. तर नव्याने याकडे वळलेले किरकोळ व्यापारी नवीन सय्यद नासीर सय्यद, रहिम तांबोळी, तय्यब लाला तांबोळी, नासेर शेख मुहम्मद शेख, शेख जमीर शेख जाहीर, अल्ताफ खॉ युसब खॉ, शेख मुक्तार शेख गनी, शेख चाँद शेख अजीज, सिकंदर खॉ नन्हे खॉ, शेख रफिक शेख रशीद, शेख एजाज शेख मुसा हे पानांच्या बाजाराला उभारी देताहेत. पानांचे शौकीन आजही त्यांचा शोक पूर्ण करण्यासाठी याची मागणी करत असल्याचे या व्यापाऱ्यांनी सांगितले. अनेक वर्षांपासून असलेल्या बाजारात अधोगती झाल्याचे व्यापारी सांगतात.
पान अद्यापही गावरानच
आज शेतीत उगवल्या जाणाऱ्या जवळपास सर्वच बाबींचे हायब्रिड वाण तयार करण्यात आले आहे. यामध्ये नानाविध प्रकार आहेत. पानाच्या बाबतीत मात्र तसे काही झाले नाही. पूर्वीपासून जे वाण लावले जात आहे त्याचाच आजही वापर केला जातो. जालना जिल्ह्यात भोकरदन, जाफराबाद तालुक्यात काही ठिकाणी पानमळे आहेत. वडिलोपार्जीत जशी पानाची शेती आजही तशीच असून पानाचे वाणही अद्याप गावरानच आहे.
चार महिने गावरान तर आठ महिने चुन्नी पानावर
पानांचा वापर करण्यात जिल्ह्यातील आठही तालुके अग्रेसर आहेत. मात्र पाने पिकवणारे भोकरदन, जाफराबाद हे दोन तालुके आहेत. येथील उत्पादित पानांचा खरेदी-विक्रीचा व्यवहार हा जालन्यातील पान बाजारात होतो. वातावरणानुसार जालन्याची गावरान पाने चार महिने पुरतात. त्यानंतर आंध्र प्रदेश येथील पानांवरच जिल्ह्यातील पान शौकिनांचा शोक भागवला जातो.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.