आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भरपाई:नुकसानीचे पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी

वडीगोद्री20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंबड तालुक्यातील वडीगोद्री व सुखापुरी महसूल मंडळामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने खरीप पिकांसह ऊस व फळबागांचे अतोनात नुकसान झाले. या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, अंबड तालुक्यातील वडीगोद्री आणि सुखापुरी महसूल मंडळात ३ सप्टेंबर रोजी झालेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे खरीप पिकांसह फळबागांचे अतोनात नुकसान झाले. फळबागांचे आगर म्हणून हा भाग ओळखला जातो. मात्र या भागातील मोसंबी, डाळिंब आदी फळपिकांचे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे मोसंबी व डाळिंब फळांची मोठ्या प्रमाणात फळगळ झाली आहे.

मोसंबीच्या अनेक फळबागा उन्मळून पडल्या. अंबड तालुक्यातील वडीगोद्री, धाकलगाव, पिठोरी सिरसगाव, शहापूर, दाढेगाव, करंजळा, जालोरा, रेवलगाव, सुखापुरी, लखमापुरी, रुई व भार्डी आदी परिसरात जोमात असलेले कपाशी पीक क्षणार्धात आडवे झाल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने १० सप्टेंबर रोजी धाकलगाव येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा जिल्हाध्यक्ष सुरेश काळे यांच्यासह गणेश गावडे, गणेश राजबिंडे, अंकुश तारख, भारत उंडे, पांडुरंग गटकळ, गोपाल खोमणे, विष्णू नागरकर आदींनी दिला.

बातम्या आणखी आहेत...