आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आढावा बैठक:डिसेंबरपर्यंत कृषिपंपांना वीज जोडणी देण्याचा निर्धार

जालना9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पैसे भरून प्रलंबित असलेल्या कृषिपंपांना डिसेंबर २०२२ पर्यंत वीज जोडणी देण्याचा महावितरणचा निर्धार असल्याने त्या दृष्टीने प्रयत्न करण्याचे निर्देश महावितरण कंपनीचे संचालक संजय ताकसांडे यांनी दिले.

शुक्रवारी औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित औरंगाबाद परिमंडल मंडळाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी मुख्य अभियंता भुजंग खंदारे, अधीक्षक अभियंता प्रकाश जमधडे, प्रवीण दरोली, अर्शदखान पठाण, सुनील काकडे, मोहन काळोगे यांची प्रमुख उपस्थिती होती. संचालक संजय ताकसांडे म्हणाले, एक लाख कृषिपंपांना वीजजोडणी देण्याच्या उद्दिष्टानुसार महावितरणकडून नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार ३० मीटर अंतरापर्यंतच्या प्रलंबित वीजजोडण्या येत्या २४ तासात देण्यात याव्यात.

तसेच ३१ ते २०० मीटर अंतर असलेल्या प्रलंबित कृषिपंप वीजजोडणीसाठी उपलब्ध असलेल्या आकस्मिक निधीच्या कामाचे शंभर टक्के आदेश काढण्यात यावेत. कृषी आकस्मिक निधी कसा वाढविता येईल, त्या दृष्टीने प्रयत्न व्हायला हवेत. तसेच २०१ मीटर ते ६०० मीटर अंतरातील प्रलंबित वीजजोडणीसाठी जिल्ह्यानुसार निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

त्यामुळे वीजजोडणीच्या कामात हयगय करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा सूचक इशारा यावेळी त्यांनी दिला. महावितरण आर्थिक संक्रमणाच्या काळातून मार्गक्रमण करत असल्याने ग्राहकांना खात्रीशीर वीजपुरवठा करण्यासह वितरित केलेल्या वीजबिलाची वसुली करणे ही महावितरणची जबाबदारी आहे. विद्युत यंत्रणेची वेळोवेळी देखभाल दुरुस्ती करणे, रोहित्र नादुरुस्त होण्याचे प्रमाण कमी करणे, जास्त वीजहानी असलेल्या वाहिन्यांवरील वितरण हानी दिलेल्या उद्दिष्टानुसार कमी करणे, मागणीनुसार वीजपुरवठा करणे ही महावितरणची जबाबदारी आहे आणि त्यानुसार काम करण्याचे निर्देश देताना कामात निष्काळजीपणा आढळल्याने पाच उपकार्यकारी अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस देण्याच्या सूचना यावेळी त्यांनी केल्या. सद्यस्थितीत वीज मीटर मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसेच पुढील काळात आवश्यकतेनुसार मीटर उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे नादुरुस्त मीटर बदलावेत आणि अचूक बिलिंग करावे, असे स्पष्ट निर्देश दिले. बैठकीस औरंगाबाद, जालना तसेच अहमदनगर जिल्ह्यातील अभियंते उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...