आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रामस्थ त्रस्त:हिसोडा ते जळकी बाजार रस्त्यावरील पुलाची दुरवस्था, विद्यार्थ्यांचे बेहाल

पिंपळगाव रेणुकाई10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोकरदन तालुक्यातील हिसोडा भागातील शेतकरी व ग्रामस्थांच्या मागणी नुसार तीन वर्षापूर्वी हिसोडा व जळकी रस्त्याचे काम पूर्ण करीत सोबतच सदर रस्त्यावर असलेल्या पुलाचे काम देखील पूर्ण केले. परंतु कामानंतरच पहिल्याच पावसात आलेल्या पुरात पुल वाहून गेला. तेव्हापासून पूल आहे त्याच अवस्थेत आहे. दुरूस्तीची वारंवार मागणी करुनही कुणीच लक्ष द्यायला तयार नसल्याने या भागातील शेतकरी, शालेय विद्यार्थ्यांना या पुलावरुन जीव धोक्यात घालुन वाट काढावी लागत आहे.

भोकरदन तालुक्यातील हिसोडा या गावापासून जवळच असलेल्या जळकी बाजार ते हिसोडा रस्त्यावर मागील काही वर्षापूर्वी रस्त्यासोबतच पूलाचे काम पूर्ण करण्यात आले होते. माञ सबंधित कंत्राटदाराने कामात गुणवत्ता न राखल्याने या पुलाचा काही भाग पहिल्याच पावसात वाहुन गेला होता. विशेष म्हणजे या ठिकाणी या पुलाचे काम होताना त्याची उंची वाढविणे गरजेचे असताना देखील व तशी मागणी देखील ग्रामस्थानी केली होती. परंतु त्याकडे तेव्हा दुर्लक्ष करण्यात आले. मागील तीन वर्षापासून या पुलाची मोठी दुरावस्था झाली आहे. या पुलावरुन वाहने व दुचाकी नेताना अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या पुलाची अवस्था आणखीनच बिकट झाली आहे. शेतकरी व शालेय विद्यार्थ्यांना या पुलावरुन जीव मुठीत धरुन प्रवास करावा लागत आहे.

जळकी बाजार येथील बरेच विद्यार्थी हिसोडा येथील शाळेत शिक्षण घेण्यासाठी येतात. मात्र खराब झालेल्या पुलामुळे पालक देखील आपल्या पाल्यांना शाळेत पाठवित नसल्याचे हिसोडा येथील शिक्षकांनी सांगितले. दरम्यान या भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणात मिरचीचे उत्पादन घेतात. सध्या मिरचीला बऱ्यापैकी भाव असल्याने येथील शेतकरी पिंपळगाव रेणुकाई येथील मिरची बाजारात मिरची विक्रीसाठी घेऊन येतात. परंतु मिरची उत्पादक शेतकऱ्यांना देखील या खडतर पुलाचा सामना करावा लागत आहे. हिसोडा भागातील शेतकऱ्यांना शिवना ही व्यापारी बाजारपेठ मोठी व जवळ असल्याने येथील शेतकऱ्यांचा जास्तीचा संबंध शिवना बाजारपेठेशी येत असल्याने त्यांनाही याच पुलावरुनच ये-जा करावी लागते. त्यामुळे या पूलाचे काम तत्काळ करण्यात यावे, अशी मागणी या भागातील शेतकरी, शालेय विद्यार्थी तसेच पालकांतुन होत आहे.

ग्रामस्थांना खान्देशात जाण्याचा शार्टकर्ट मार्ग
या भागातील नागरिकांना खान्देशात जाण्यासाठी हा जवळचा मार्ग आहे. तसेच पर्यटन स्थळ म्हणून जगभर प्रसिद्ध असलेल्या अजिंठा लेणीकडे देखील जाण्यासाठी हा मार्ग सोयीस्कर आहे. परंतु खराब पुलामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत असल्याचे चिञ आहे.

पुलाचे काम तत्काळ होणे गरजेचे
हिसोडा जळकी बाजार रस्त्यावर असणाऱ्या पुलाची मागील तीन ते चार वर्षापासून दुरावस्था झाली आहे. त्यामुळे शेतकरी व शालेय विद्यार्थ्यांचे मोठे हाल होत आहेत. शेती विकासाच्या दृष्टीने या पुलाचे काम होणे गरजेचे आहे. त्यामुळे संबंधित विभागाने या पुलाचे काम तत्काळ मार्गी लावुन या भागातील नागरिक व शालेय विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवाव्यात, अशी मागणी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष प्रमोद जगताप यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...