आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:ज्ञानेश्वरी, गीतेकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याची गरज

जालना2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपले कुटुंब हीच आपली खरी संपत्ती असल्याने व कुटुंब हा देशाचा एक महत्वपूर्ण घटक असल्याने देशाचीही खरी संपत्ती आहे. म्हणून कुटुंबाला आळस, नैराश्य, ताणतणाव, ईर्षा आदी शत्रूंची नजरभेट सुध्दा होणार नाही, याची काळजी आपण घ्यायला हवी. अशी योग्य ती काळजी घेण्यासाठी श्री ज्ञानेश्वरीकडे व श्रीगीतेकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याची गरज असल्याचे डॉ. विजयकुमार फड यांनी सांगितले.

गीता जयंती सोहळयानिमित्त आयोजित कार्यक्रमात जगाला ज्ञानाचा प्रकाश देणारी संत श्री ज्ञानेश्वर माऊलींची ज्ञानेश्वरी व अन्यायाविरूध्द लढण्याचा आणि कर्तव्य जबाबदारीचा मार्ग दाखवणा-या श्रीकृष्णांनी सांगीतलेल्या गीतेचा अभ्यासक असणा-या ज्ञानेश्वर चव्हाण यांचा श्री ज्ञानेश्वरी व गीता देऊन श्री माऊली भजनी मंडळाच्या वतीने डॉ. विजयकुमार फड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आनंदी जीवनासाठी चव्हाण यांच्या प्रमाणे गीता व ज्ञानेश्वरीचा अभ्यासक होणे आवश्यक असल्याचे फड म्हणाले. भाविकांनी गीता, ज्ञानेश्वरी, चांगदेव पासष्टी, हरिपाठ, माऊलींचे स्फुट अभंग, निवृत्तीनाथांचे अभंग प्रत्यक्षात आचरणात आणले पाहिजेत. बंधू भगीणीवर कसे प्रेम करावे, त्यांना कसे घडवावे हे निवृत्तीनाथ व ज्ञानदेवांकडून शिकण्यासारखे आहे. अन्याय सहन करणे हे चुकीचे असल्याचे व न्यायासाठी लढणे योग्य असल्याचे श्रीकृष्णांकडून शिकायला हवे.

इर्षा, व्देष, मत्सर, क्रोध, अहंकार आदी विकारांनी भरलेल्या संसारामध्ये खऱ्या अर्थाने विश्रांती मिळवायची असेल तर संत एकनाथांच्या, “ भाव धरोनिया वाची ज्ञानेश्वरी । कृपा करी हरी तयावरी॥, स्वमुखे आपण सांगे तो श्रीविष्णु । श्री गीता हा प्रश्नु अर्जुनेसी ॥” या म्हणण्याप्रमाणे श्री ज्ञानेश्वरी व गीता अभ्यास व आचरण करण्याची गरज आहे. कार्यक्रमाच्या प्रारंभी श्री ज्ञानदेवांच्या आणि श्रीकृष्णांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या कार्यक्रमास भगवान थिटे, मारोती इंगळे, पांडुरंग वाघमारे, रमेश केसकर, जालिंदर नारायणे, दिगंबर म्हस्के, परमेश्वर सानप, रोहिदास पवार आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचा समारोप पसायदानाने करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...