आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभक्तीला कर्तव्याची जोड दिली तर भक्तीला बळकटी येऊन आत्मबल वाढते आणि वाढत्या आत्मबलातून आनंदाच्या लहरी निर्माण होऊन आनंद मिळतो. आनंदलहरीची ऊर्जा देणारी श्री ज्ञानेश्वरी हा ग्रंथ भाविकांसाठी आनंदाचे प्रेरणास्रोत आहे, असे प्रतिपादन डॉ. विजयकुमार फड यांनी केले. धार्मिक सप्ताहानिमित्त जालना शहरातील समर्थनगर येथील वरद गणेश मंदीर समितीतर्फे ज्ञानदास डॉ. फड यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. या कीर्तनात डॉ. फड यांनी ज्ञानेश्वरीची महती स्पष्ट केली. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ खऱ्या अर्थाने आनंदाची अनुभूती देणारा ग्रंथ असल्याचे ते म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, कर्तव्य हाच भक्तीचा व मानवी जीवनाचा आधारस्तंभ आहे. म्हणून श्रीमद्भगवत गीता आणि श्री ज्ञानेश्वरीत कर्तव्यावरच भर देण्यात आला आहे. वाट्याला आलेले कर्तव्य सोडून कोणी कितीही भक्ती केली तरी खऱ्या अर्थाने त्याच्या पदरी काही पडत नाही. अर्थात, कर्तव्याविना केलेली भक्ती कोरडी असते. त्यामुळे सामाजिक ऋणांची जाण ठेवून वाट्याला आलेले कर्तव्य पार पाडावे. कर्तव्य वाट्याला आले नाही असा कोणी असू शकत नाही. दैनंदिन कर्तव्य जरी नीतिनियमाला अनुसरून पार पाडली तरी जीवनातील व समाजातील बरेच प्रश्न मिटू शकतात.
असे सांगून प्रत्येक जीवात भगवंताचे अस्तित्व मानून प्रत्येक जीवाचा मान सन्मान करणे, त्याला त्याच्या हक्कापासून वंचित न ठेवणे म्हणजेच ईश्वरी भक्ती होय. नैसर्गिक संकटात गरजूंना दान, सहकार्य करून आनंदी व्हावे, असेही डॉ. फड यांनी संतांच्या काही ओव्या, अभंग व उदाहरणांच्या आधारे स्पष्ट केले. यावेळी ॲड. दीपक कोल्हे, परमेश्वर सानप, भगवानराव घुगे, सिरसाट महाराज यांच्यासह परिसरातील भाविकांची उपस्थिती होती. दरम्यान, समर्थनगरात सप्ताहनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल सुरु आहे.
ज्ञानेश्वरीतील ओव्यांचा प्रत्यक्ष अनुभव घेतला पाहिजे
दैनंदिन जीवनातील वाढता ताणतणाव व या तणावा मागची कारणे विचारात घेऊन जीवनात शांती, तणावमुक्ती, सुख, समाधान, सफलता, समृध्दी, आत्मबल, स्वपरिचय, आत्मोन्नती, धर्मोन्नती, न्यायदृष्टी, मनोधैर्य, औदार्य, चिंतामुक्ती, मनोबल, मानसिक स्थैर्य, आत्मभाव, विवेक, सकारात्मक दृष्टी या माध्यमातून आनंदाच्या लहरी निर्माण होण्यासाठी श्री ज्ञानेश्वरीतील ओव्यांचा प्रत्यक्ष अनुभव घ्यावा असे आवाहन डॉ. फड यांनी केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.