आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उजाळा:डॉ. कोत्तापल्लेंना श्रद्धांजली, गत स्मृतींना दिला उजाळा

मंठा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील मसापच्या वतीने डॉ नागनाथ कोत्तापल्ले यांना रविवारी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. भारत खंदारे उपस्थित होते. प्रारंभी ए.जे. बोराडेसह उपस्थितांनी डॉ.नागनाथ कोतापल्ले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. . प्रा. सोनाजी कामिटे म्हणाले की, मराठी विषयात पदव्यूत्तर शिक्षण घेत असताना डॉ.नागनाथ कोत्तापल्ले यांचा मार्गदर्शक म्हणून सहवास लाभला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कोत्तापल्ले सरांचा मोठा आधार वाटत असे. त्यांची वैचारिक भूमिका ठाम असायची.

लेखक आणि समीक्षक म्हणून त्यांनी विपूल लिखाण केले असून, दलित व ग्रामीण साहित्य परंपरेत त्यांचे अत्यंत मोलाचे योगदान आहे. यावेळी बोलताना प्रा. प्रदीप देशमुख म्हणाले की, डॉ नागनाथ कोत्तापल्ले यांनी एका पिढीला लिहितं करून त्यांच्या पंखात बळ निर्माण करण्याचे काम केले. कथा, कविता, कादंबरी, समीक्षात्मक आणि वैचारिक लिखाण करणारे चतुरस्त्र साहित्यिक म्हणून सबंध महाराष्ट्र त्यांना ओळखतो. साठोत्तरी वाङमयीन प्रवाहात त्यांनी केलेले समीक्षात्मक लिखाण अतिशय मूलगामी आणि साहित्य परंपरेला दिशादर्शक ठरणारे आहे.

त्यांच्या निधनामुळे शिक्षण,भाषा चळवळ आणि साहित्य क्षेत्राची अपरिमित हानी झाली आहे. याप्रसंगी बोलताना सुधाकर शिंदे म्हणाले की, विद्यापीठात शिक्षण घेत असताना कमवा आणि शिका या योजनेअंतर्गत सरांचा आणि माझा परिचय झाला. त्यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नेहमीच आधार दिला. ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थ्यानी लिहिलं पाहिजे असा त्यांचा नेहमीच आग्रह असायचा. अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉ.भारत खंदारे म्हणाले की, कुलगुरू म्हणून डॉ.नागनाथ कोत्तापल्ले यांची कारकीर्द ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आणि शिक्षण संस्थांना न्याय देणारी होती.

अनेक जाचक अटींना शिथिलता देऊन त्यांनी ग्रामीण भागातील आणि तालुका पातळीवरील महाविद्यालयांचा शैक्षणिक विकास व्हावा, त्यांना पायाभूत सुविधा मिळाव्यात यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या निधनामुळे साहित्य क्षेत्रासोबतच शिक्षण क्षेत्राची देखील मोठी हानी झाल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ. सदाशिव कमळकर यांनी केले तर आभार एकनाथ काकडे यांनी मानले. कार्यक्रमासाठी भाऊसाहेब गोरे, प्रा.अशोक खरात, डॉ.संतोष मोरे, आर.के. राठोड, अनिल पांडे, कृष्णा भावसार, काशिनाथ गोंडगे, छत्रगुण तळेकर आदींची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...