आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकरी सुखावला:पिंपळगाव रेणुकाई परिसरात पडलेल्या जोरदार पावसाने शेतकऱ्यांनी पेरणीची मूठ धरली; कपाशी, सोयाबीन लागवडीसाठी लगबग सुरू

पिंपळगाव रेणुकाईएका दिवसापूर्वी
  • कॉपी लिंक

भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई परिसरात मंगळवारी सायंकाळी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. या पावसाचा आधार घेत परिसरातील शेतकऱ्यांनी हा-ना करत पेरणीची मूठ धरली. परंतु बुधवारी दुपारी साडेतीन वाजेच्या दरम्यान अचानक धुवाधार पावसाने हजेरी लावल्याने शेतात सगळीकडे पाणी साचले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना पेरणीची कामे थांबून घरचा रस्ता धरावा लागला. दरम्यान, मशागतीचे कामे आटोपून मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांची पावसाची प्रतीक्षा आता संपली आहे. गुरुवारी सकाळपासूनच शेत परिसरात शेतकऱ्यांनी कपाशी, मका, सोयाबीन लागवडीसाठी लगबग सुरू केले असल्याचे चित्र पाहावयास मिळाले आहे. तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई परिसरातील शेतकऱ्यांनी शेतीतील संपूर्ण कामे आटोपून शेती पेरणीसाठी तयार करून ठेवली आहे. शिवाय बहुतांश शेतकऱ्यांनी ठिबकवर कपाशी व मिरची पिकाची लागवड केलेली आहे. पाऊस लांबल्याने विहिरींनी तळ गाठण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे धुळ पेरणी केलेल्या शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले होते. शिवाय बरेच शेतकरी पेरणीच्या प्रतीक्षेत होते. ते देखील पावसाकडे डोळे लावून बसले होते. दोन दिवसापुर्वी पावसाने राञी काही प्रमाणात या भागात हजेरी लावली. परंतु हा पाऊस पेरणी योग्य नसल्याने शेतकऱ्यांना आणखी मोठ्या पावसाची प्रतिक्षा होती. परंतु बुधवारी सकाळपासूनच वातावरण उकाडा व आकाशात नभ दाटून आले होते. त्याचे रुपांतर दुपारी साडे तीन वाजता पावसात झाले.

तब्बल तासभर झालेल्या पावसाने धुव्वाधार पावसाने शेतात सगळीकडे पाण्याचे डोह साचले होते. पेरणी केलेल्या पिकांना जिवदान मिळाले आहे. गुरूवारी शेतकऱ्यांनी शेतात वाफसा झाल्यावर पेरणी करण्यास वेग दिला. पावसाने विलबांने हजेरी लावली असली तरी शेतकरी आनंदी आहेत. यापुढे देखील निसर्गाने अशाच प्रकारे साथ द्यावी अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. शुक्रवारी देखील पावसाचे सायकांळ पर्यत कमी अधीक शिपकारे सुरुच होते. दरम्यान पिंपळगाव रेणुकाई, लेहा, शेलुद, अवघडराव सावंगी, वरुड, करजगाव, कल्याणी, रेलगाव, कोसगाव, मोहळाई आदीसह इतर भागात देखील पेरणीयोग्य पाऊस झाल्याने शेतकरी सुखावला आहे. दरवर्षी खरीपात शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या कमकुवत होत चालला आहे.

यंदा हवामान खात्याने चांगल्या पावसाचा अंदाज दिला आहे. त्यामुळे शेतकरी उत्साही आहे. बऱ्याच शेतकऱ्यांनी मोठी तजवीज करुन पेरणीची तयारी केली आहे. तर बरेच शेतकरी अद्यापही पेरणीसाठी बँकेच उंबरठे झिजवताना दिसत आहे. परंतु बँकाकडुन प्रतिसाद मिळत नसल्याने शेतकरी सावकराच्या दारात जाऊ लागला आहे. शेतकऱ्यांचे संपूर्ण अर्थकारण खरीपावर अवलंबून असते त्यामुळे वेळेत पेरणी झाली तर पिकाची उगवण क्षमता देखील चांगली राहते यासाठी शेतकरी सध्या पेरणीच्या तयारीत आहे.

तीन एकर मक्याची केली लागवड
बुधवारी पेरणी यंत्राद्वारे तीन एकर मका पिकाची लागवड केली आहे. पेरणी झाल्यावर लगेच सायंकाळी पाणी पडल्याने मकाचे पीक आता ताशी लागले आहे. निसर्गाने अशाच प्रकारे शेतकऱ्यांना साथ द्यावी. पिंपळगाव रेणुकाई येथे पेरणी योग्य पाऊस झाला असल्याचे पिंपळगाव रेणुकाईचे शेतकरी नीलेश दळवी म्हणाले.

पेरणीयोग्य पाऊस पडू द्यावा
भोकरदन तालुक्यात खरीप पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. किमान शंभर मिलिमीटर पाऊस पडेपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणीची गडबड करू नये. शेतकऱ्यांनी कृषी विभागाचे मार्गदर्शन घेऊन बियाण्याची पेरणी करावी, असे तालुका कृषी अधिकारी रामेश्वर भुते यांनी सांगितले.

बँकांनी वेठीस धरू नये
दरवर्षी निर्माण होत असलेल्या नैसर्गिक संकटामुळे शेतकरी हतबल झाला आहे. शेतकऱ्यांचे संपूर्ण अर्थकारण खरिपावर अवलंबून आहे. त्यामुळे बँकांनी शेतकऱ्यांना वेठीस न धरता आवश्यक कागदपत्रे जमा करून शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे, जेणेकरून शेतकऱ्यांना पेरणी करणे सोपे होईल. खरीप पेरणीसाठी शेतकऱ्यांना विविध अडचणीचा सामना करावा लागत आहे.
राजेद्र देशमुख, भाजप तालुकाध्यक्ष

बातम्या आणखी आहेत...