आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकेंद्र शासनाने पेट्रोल आणि डिझेलवरील अबकारी कर कमी केल्याने दोन्ही इंधनाच्या किमतीमध्ये दहा ते सात रुपयाची घसरण झाली आहे. त्यातच काही तेल उत्पादक कंपन्यांनी पेट्रोल पंप चालकांसाठी रेशनिंग धोरण चालू करत डिझेलच्या साठ्यावर मर्यादा आणली आहे.त्यामुळे मागील काही दिवसांपासून शहरासह ग्रामीण भागात पंपावर डिझेल उपलब्ध राहत नसल्याने काहींना पंपच बंद ठेवावे लागत आहे तर काहींनी डिझेल उपलब्ध नसल्याचे फलक लावले आहेत. ऐन खरिपाच्या तोंडावर व लग्नघाईत डिझेल तुटवडा निर्माण झाला असल्याने शेतकऱ्यांसह वाहनधारकांचे हाल होत आहेत.
पेट्रोल डिझेल इंधनाच्या दराने शंभरी पार केली आहे. त्यामुळे ही दरवाढ नक्कीच सर्वसामान्याची कबंरडे मोडणारी आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळावा म्हणून केंद्र शासनाने पेट्रोल व डिझेलच्या दरात मागील काही दिवसांपूर्वी कपात केली आहे. परंतु दरवाढीत कपात झाल्यापासून शहरात व ग्रामीण भागात जनतेच्या सेवेसाठी उभ्या असलेल्या पंप चालकांनी मनमानी धोरण अवलंबून पंपावर कृत्रिम डिझेलची टंचाई दाखवीत पंप बंद ठेवण्याचा सपाटा लावला आहे.
त्यामुळे पंपावर येणाऱ्या ग्राहकांना ऑनने पेट्रोल व डिझेलची खरेदी करावी लागत असल्याने नाहकचा आर्थिक भुर्दंड ग्राहकांना सहन करावा लागत आहे. दरम्यान, सध्या पावसाळा तोंडावर आला असल्याने शेती मशागतीच्या कामांनी वेग घेतला आहे. एकीकडे शासन शेतीच्या यांत्रिकीकरणावर भर देत आहे, तर दुसरीकडे यंत्र चालविण्यासाठी डिझेल व पेट्रोल मिळत नसल्याने शेती कामात इंधनाचा खोडा निर्माण होत आहे. गेल्या काही वर्षांपासून शेतकरी यांत्रिक शेतीवर भर देत आहे. तसेच दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांनी पशुधनाची विक्री केली. त्यामुळे शेतकऱ्यांना शेती कामासाठी पूर्णतः यत्रांवर अवलंबून राहावे लागत आहे. परंतु सध्या डिझेलच नसल्याने ग्रामीण भागात दळणवळणाच्या व्यवस्थेला अडचणी निर्माण होत आहे. त्यामुळे शासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे असून जो कुणी पंपचालक डिझेल असून पंपावर कृत्रिम डिझेल टंचाई दाखवत असेल तर त्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
आठवडी बाजारावर झाला परिणाम, तुरळक उपस्थिती
तालुक्यात पिंपळगाव रेणुकाई येथे सर्वात मोठा आठवडी बाजार भरतो. परंतु या आठवड्यात पंपावर इंधनाची टंचाई निर्माण झाल्याने वाहने जागेवर थांबली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना माल वाहतूक करणे व बाजारात येण्या-जाण्यासाठी वाहनच उपलब्ध नसल्याने मंगळवारी भरलेल्या आठवडी बाजारावर परिणाम दिसून आला. खरेदी -विक्रीचे व्यवहारही जेमतेमच झाले.
एकच पंप असल्याने गावात आणखी डिझेल पंप सुरू करण्याची मागणी
पिंपळगाव रेणुकाई हे गाव मोठी बाजारपेठेचे ठिकाण आहे. या गावात जवळजवळ बत्तीस खेड्यातील नागरिकांना नेहमी राबता असतो.शिवाय या ठिकाणाहून विदर्भ, खान्देश आणि मराठवाडा जाण्यासाठी राज्यमार्गाचीदेखील निर्मिती करण्यात आलेली आहे. परंतु या ठिकाणी भारत पेट्रोलियम कंपनीचा एकमेव पंप असल्याने या ठिकाणी पंपावर नेहमी गर्दी असते. शिवाय कधी डिझेलचा तुटवडा तर कधी मनुष्यबळाचा अभाव तर कधी विजेची समस्या अशा एक ना अनेक समस्या या पंपावर सुरू असतात त्यामुळे वाहनधारकांची गैरसोय होते. त्यामुळे या ठिकाणी इतर पेट्रोलियम कंपन्यांनी लक्ष घालून या ठिकाणी पंपाची उभारणी करावी अशी मागणी परिसरातील वाहनधारक आणि शेतकऱ्यांतून होत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.