आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाजार समितीचे विभाजन:बदनापूर येथे स्वतंत्र कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निर्णयामुळे शिवसेना, व्यापारी, शेतकऱ्यांत जल्लोष

जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जालना कृषी उत्पन्न बाजार समितीत समाविष्ट असलेल्या बदनापुर तालुक्यासाठी विभाजनाद्वारे स्वतंत्र बाजार समिती निर्माण करण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधकांनी काढले. या निर्णयाचे मंगळवारी शिवसेना पदाधिकारी, व्यापारी, शेतकरी व हमाल मापाडी यांच्यातर्फे स्वागत करण्यात आले. माजी आमदार संतोष सांबरे, युवा सेना जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी, शिवसैनिक व शेतकऱ्यांनी बदनापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात फटाक्यांची आतिषबाजी करत एकमेकांना पेढे भरून जल्लोष साजरा केला.

बदनापूर तालुक्यासाठी स्वतंत्र बाजारपेठ निर्माण व्हावी अशी तालुक्यातील शेतकऱ्यांची मागील २० वर्षांपासून मागणी होती. शिवसेना नेते, माजी राज्यमंत्री तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अर्जुन खोतकर यांच्याकडे तालुक्यातील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व शेतकऱ्यांनी याबाबत वारंवार मागणी करून बाजारपेठ निर्मितीसाठी साकडे घातले. खोतकर यांनी सर्वसाधारण सभेत या संदर्भात ठराव घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, पणन व सहकार राज्यमंत्री शंभूराजे देसाई यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यास अखेर यश प्राप्त झाले.

शासन निर्णयानुसार सोमवारी जिल्हा उपनिबंधकांनी परिपत्रकाद्वारे जालना व बदनापूर येथे प्रशासकांची नियुक्ती केली. या निर्णयामुळे बदनापूर तालुक्यात व्यापारी, शेतकरी व हमाल मापाडी यांना आशेचा किरण निर्माण झाला असल्याने शिवसेना पदाधिकारी, व्यापारी, शेतकरी व हमाला मापाडी यांनी आज संयुक्तरीत्या जल्लोष साजरा केला. यावेळी माजी आमदार संतोष सांबरे, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख भगवान कदम, महेंद्र इंदुलकर, पूजा टेहरे, अंकुश शिंदे, अशोक बर्डे, कैलास दुधानी, नंदकिशोर दाभाडे, महादू गीते, सिद्धेश्वर उबाळे, दासू पाटोळे, राजू थोरात, दीपक शिंदे, शेख तारेख, गणपत केकान, संतोष नागवे, विलास सावंत, समाधान दराडे, संजय चव्हाण, सारंग गोळे, शेख अफरोज, संजय घुगे, भरत खाडे, सुनील बनकर, दत्ता पवार यांच्यासह आदींची उपस्थिती होती.

शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक निर्णय
जालना बाजार समितीचे विभाजन होऊन बदनापूर येथे स्वतंत्र बाजार समिती निर्माण झाली. शासनाने घेतलेला हा ऐतिहासिक निर्णय स्वागतार्ह आहे. बदनापूर तालुक्यातील शेतकऱ्यांची अनेक वर्षांपासून ची मागणी अखेर पूर्ण झाली असून या ऐतिहासिक निर्णयामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळाला अशी प्रतिक्रिया जय भिम सेनेचे संस्थापक अध्यक्ष सुधाकर भाई निकाळजे यांनी व्यक्त केली.

नवीन गाळे विकसित करावे
जालना बाजार समितीचे विभाजन करुन बदनापूरला स्वतंत्र बाजारपेठ निर्माण केल्यामुळे तालुक्यात आता व्यापार वाढणार असल्याने बाजार समितीच्या आवारात काही गाळे तयार आहेत तर उर्वरित सहान जागेवर नवीन गाळ्यांची उभारणी करून ते स्थानिकांना दिले जावेत. व्यापारी वर्गात या निर्णयामुळे उत्साह संचारला असल्याचे किराणा व्यापारी परेश कटारिया यांनी सांगितले.

शेतकरी, व्यापाऱ्यांना उभारी देणारा निर्णय
स्वतंत्र बाजारपेठेमुळे बदनापूर शहरात उलाढाल वाढेल, शेतमाल, व्यापार, उद्योग, दळणवळण यास चालना मिळून रोजगाराच्या संधी वाढतील. शेतकऱ्यांना जालना येथे नेण्यासाठी लागणारा वाहतुकीचा खर्च टळेल स्थानिक पातळीवर व्यापारी योग्य भाव देणार असल्याने शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल, बदनापूरातच शेतमाल विक्री होणार असल्याने साहित्य खरेदीची उलाढाल वाढेल.
संतोष सांबरे, माजी आमदार, बदनापूर

वाहतुकीचा भुर्दंड कमी होण्यास मदत
भाजीपाला, कापूस, भुसार माल विक्रीची स्थानिक पातळीवर व्यवस्था होणार असल्याने जालना येथे नेण्यास लागणारा वाहतुकीचा भुर्दंड कमी होईल. मागील वीस वर्षांपासून तालुक्‍यातील शेतकऱ्यांची असलेली मागणी पूर्ण व्हावी यासाठी आपण सभापती अर्जुन खोतकर यांच्या अध्यक्षतेखाली सहा महिन्यांपूर्वी सर्वसाधारण सभेत स्वतंत्र बाजारपेठे बाबत ठराव मांडला होता.
महादू गीते, सभासद शेतकरी, अकोला

बातम्या आणखी आहेत...