आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा जी-२० मुळे छत्रपती संभाजीनगर शहर एकीकडे सुंदर व सुशोभित झाले असताना जालना शहरात मात्र त्या तुलनेत सर्वत्र धुळीचे साम्राज्य आणि विद्रूप झालेल्या पुलाच्या भिंती दिसत आहेत. हे चित्र आता काही प्रमाणात का असेना बदलण्यास सुरुवात होत आहे. त्याचाच एक भाग म्हणून शहरातील विविध भिंती रंगवण्यासाठी २० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्याशिवाय शहरात चार ठिकाणी व्हर्टिकल गार्डन निर्माण करण्यात येत आहेत. पुढील चार महिन्यांत ही सर्व कामे पूर्ण होतील असा विश्वास पालिका प्रशासनाने व्यक्त केला आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात जी-२० परिषदेच्या निमित्ताने झालेला लक्षवेधी बदल आणि दुसरीकडे जालना शहरातील परिस्थिती यासंदर्भात दै. दिव्य मराठीने २५ फेब्रुवारी रोजी वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानंतर विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या जालनेकरांनी शहर स्वच्छ व सुशोभित करण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेण्याची अपेक्षा व्यक्त केली होती. त्यानुसार पालिका प्रशासनाने काम सुरू केले आहे. शहराच्या मुख्य भागात असलेल्या शासकीय कार्यालयाच्या संरक्षक भिंती, सर्व ९ जलकुंभ आणि काही प्रमुख ठिकाणी भिंतीवर स्वच्छतेचे संदेश देणारे चित्र रेखाटण्यात येणार आहे. त्याशिवाय उड्डाणपुलांचीही रंगरंगोटी करून त्यावरही असे संदेश लिहिले जाणार आहेत. या कामासाठी २० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती पालिका मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांनी दिली. हे काम तातडीने सुरू केले जाणार आहे. त्याशिवाय केंद्र सरकारच्या निधीतून केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या मदतीने शहरात चार ठिकाणी व्हर्टिकल गार्डन निर्माण केले जाणार आहेत. पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण केले जाणार आहे.
पावसाळ्यात वृक्षलागवड
मंठा चौफुली ते छत्रपती संभाजीनगर रोडवर असलेल्या विशाल कॉर्नर या बायपास रस्त्यावर दुभाजकाच्या मध्ये वृक्ष लागवड केली जाणार आहे. त्यासाठी दुभाजकात काळी माती टाकण्याचे काम दोन दिवसांपासून सुरू करण्यात आले आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने हे काम हाती घेतले आहे. सध्या सर्व तयारी पूर्ण करून पावसाळा सुरू होताच येथे वृक्ष लागवड केली जाणार असल्याचे कार्यकारी अभियंता विक्रांत शिरभाते यांनी दिव्य मराठीशी बोलताना सांगितले.
कुंडलिकाकाठी व्हर्टिकल गार्डन
शहरात कुंडलिका नदीच्या काठी चार ठिकाणी पुलाच्या दोन्ही बाजूंनी व्हर्टिकल गार्डन निर्माण केले जाणार आहे. यात कुंडलिका नदीवरील रामतीर्थ पुल, बसस्थानकाजवळचा सीना नदीवरील पूल, देहेडकरवाडी येथील पूल आणि मंमादेवी मंदिराजवळ असलेल्या पुलाची निवड करण्यात आली आहे. ही चारही उद्याने तयार झाली तर शहर सुशोभित करण्याच्या प्रयत्नाचा तो प्रमुख टप्पा ठरणार आहे.
पावसाळ्यात बदल दिसेल
शहरातील प्रमुख सार्वजनिक भिंती, पूल आणि जलकुंभ याची रंगरंगोटी आपण करणार आहोत. या कामासाठी २० लाखांची तरतूद केली आहे. अन्यही काही कामे शहरात होत आहेत. साधारणपणे तीन महिन्यांत ही कामे पूर्ण झालेली असतील. पाऊस पडल्यानंतर आपल्याला यात चांगला बदल झालेला दिसेल. - संतोष खांडेकर, मुख्याधिकारी, नगरपालिका
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.