आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कीर्तनसेवा:कर्तव्य हाच भक्तीचा आणि मानवी जीवनाचा खरा आधारस्तंभ होय..

अंबडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कर्तव्य हाच भक्तीचा व मानवी जीवनाचा आधारस्तंभ आहे. म्हणून श्रीमद्भगवत गीता आणि श्री ज्ञानेश्वरीत कर्तव्यावरच भर देण्यात आला आहे. वाट्याला आलेले कर्तव्य सोडून कोणी कितीही भक्ती केली तरी खऱ्या अर्थाने त्याच्या पदरी काही पडत नाही. म्हणून कर्तव्यात कसूर होणार नाही याकडे लक्ष दिले पाहिजे, असे डॉ. विजयकुमार फड यांनी सांगितले.

अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे दरवर्षीप्रमाणे कीर्तन उत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळयातील पहिल्या दिवशीचे कीर्तन सेवेचे पुष्प गुंफतांना डॉ. फड यांनी संत तुकाराम महाराजांच्या क्षण क्षणा हाची करावा विचार । तरावया पार भवसिंधू ॥ या अभंगावर निरुपन केले. आई वडिलांचे खरे हित त्यांची मुलं चांगली निर्माण होण्यात असते असे सांगीतले. मुलं ही केवळ मोठ्या महाविद्यालयात गेल्याने किंवा चार-दोन खासगी शिकवण्या लावल्याने चांगली निर्माण होत नाहीत, तर त्यांचेवर घरात होणारे संस्कार महत्त्वाचे असतात.

त्यामुळे आईवडीलांनी त्यांच्या आईवडीलांशी, बहिण भावंडांशी, शेजाऱ्या पाजाऱ्यांशी चांगले वागले पाहिजे. चांगले वागण्यासाठी पैसा खर्च करावा लागत नाही तर फक्त ईर्षा, व्देष, मत्सर, अहंकार, काम, क्रोध, या मानवतेच्या शत्रूंचा त्याग करावा लागतो, असे सांगून डॉ. विजयकुमार फड यांनी समाजातील अनेक अनिष्ट प्रथावर विविध अभंग, श्लोक, ओव्यांच्या आधारे मत मांडले.

अंतर्बाह्य स्वच्छता, वृक्षारोपण, स्त्रीयांचा मान सन्मान, वडीलधाऱ्यांची सेवा, गरजूंना मदत अशा बाबींवर त्यांनी भर देत मुलांना अभ्यासाच्या दृष्टीकोणातून मार्गदर्शन केले. लोक कसेही वागोत आपण चांगलेच वागले पाहिजे अशी उपस्थितांनी त्यांची मानसिकता करून घेतल्याचे कीर्तनाअंती जाणवले. दरम्यान, कसल्याही प्रकारचे मानधन व गाडी भाडे न घेता कीर्तन केल्याने व मानधन दिले असता ते घेण्यास नकार दिल्याने ग्रामस्थांनी डॉ. फड यांचा सत्कार केला. यावेळी पंचक्रोशीतील भाविकांची मोठी उपस्थिती हेाती.

बातम्या आणखी आहेत...