आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागुवाहाटी बंडावेळी गुरुदेव श्री. श्री. रवीशंकर यांनी आपल्याला आशीर्वाद दिला होता, असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. ते गुरुवारी जालना येथे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्री. श्री. रवीशंकर गुरुजी यांचीही उपस्थिती होती.
मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी श्री. श्री. रवीशंकर गुरुजींच्या यांच्या कामाचे तोंडभरून कौतुक केले. मोदी सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प सर्वसमावेश असल्याचेही ते म्हणाले.
तो 'कार्यक्रम' झाल्यामुळे...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, जेव्हा आम्ही गुवाहाटीला होतो. तेव्हा गुरुदेवांनी मला फोनवर आशीर्वाद दिला होता. आम्ही त्यांना एक लढाई आम्ही सुरू केलेली आहे, असे सांगितले. तेव्हा ते म्हणाले, बिलकुल चांगले आहे. चांगले काम करत राहा. अच्छा, सफल व्हा. गुरुदेवजी चांगले काम करणाऱ्यांच्या पाठिशी उभे राहतात. त्यावेळी तो 'कार्यक्रम' झाल्यामुळे आता हे 'कार्यक्रम' सुरू आहेत. गुरुदेव आमचे सरकार जे आम्हाला चांगला सल्ला देतील, त्याचा सन्मान करेल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
जलसंधारणाचे मोठे काम
एकनाथ शिंदे म्हणाले की, श्री. श्री. रवीशंकर यांचे अध्यात्म, व्यसनमुक्ती, तणावमुक्ती, नैसर्गिक शेती, जलसंधारणातही त्यांचे फार मोठे काम आहे. आपल्याला जलतारा, जलसंधारण, जलयुक्त शिवार या योजनांना पुढे न्यायचे आहे.
उद्योगांनी दाखवला विश्वास
आम्ही दाओसमध्ये गेलो तेव्हा एक लाख 37 हजारांचे एमएओ केले. हे दाखवण्यासाठी नाही, तर प्रत्यक्षात आणण्यासाठी. या राज्यासाठी त्याचा खूप फायदा होईल. राज्यात आणि केंद्रात विकासाचा विचार करणारे समविचारी सरकार आहे. त्यामुळे अनेक उद्योग आमच्यावर विश्वास दाखवत आहेत. लोकांना विश्वास पाहिजे. तो विश्वास मोदी साहेबांनी या जगाला दिला असल्याचे शिंदे म्हणाले.
एक लाख गावांत जलतारा
गुरुदेवांनी दाओसमध्ये येऊनही आम्हाला आशीर्वाद दिला. गेल्या सहा महिन्यांत आमच्या सरकारने अनेक मोठे निर्णय घेतले. यातला एकही निर्णय वैयक्तिक लाभ देणारा नाही. गणपती, नवरात्रोत्सव, दीपावली सगळे सण आम्ही पुन्हा सुरू केले. शेवटी माणसाने मनमोकळेपणाने आपले सण, उत्सव साजरे केले पाहिजेत. ही आपली परंपरा आहे. एक लाख गावांमध्ये जलतारा प्रकल्प राबवण्याचा श्री श्री रवीशंकर यांचा संकल्प असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
दैवाश्रय आणि राजाश्रय
श्री. श्री. रवीशंकर म्हणाले की, पूर्वी जेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी जलयुक्त शिवारचे काम केले. तेव्हा ते म्हणाले होते की, आमचे ७० टक्के काम हे आर्ट ऑफ लिव्हिंगच्या स्वयंसेवकांच्या माध्यमातून झाले आहे. स्वयंसेवक जेव्हा कोणते काम हाती घेतात. तेव्हा ते सफल होतेच. कारण दैवाश्रय आणि राजाश्रय सोबत घेऊन चालतात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.