आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभोकरदन तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा उत्साह शिगेला पोहोचला असून, प्रचाराची धामधूम सुरू आहे. मात्र, प्रचारादरम्यान निवडणूक आचार संहितेचे नियम पायदळी तुडविले जात आहेत. सोशल मीडियावर नियमबाह्य पध्दतीने प्रचाराचा भडिमार सुरु आहे. याकडे निवडणूक विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आता सर्वसामान्यांमधून होवू लागला आहे.
भोकरदन तालुक्यातील ३२ ग्रामपंचायतीसाठी निवडणुक होणार असुन २ ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या आहे. या शिवाय २ सरपंचासह ४५ सदस्य बिनविरोध झाल्याने आता सरपंच २८ व २१९ ग्रामपंचायत सदस्यांसाठी निवडणूक आगामी १८ डिसेंबर रोजी होणार आहे. या निवडणुकीत २८ सरपंचपदासाठी ७८ तर २१९ सदस्यांसाठी तब्बल ४५५ उमेदवार निवडणूक मैदानात नशिब आजमावित आहेत. यावेळी सरंपचाची निवड थेट जनतेतून होणार असल्याने प्रमुख राजकीय पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. त्यामुळे अवघ्या तीन दोन दिवसावर येवून ठेपलेल्या निवडणुकीचा जोरदार प्रचार केल्या जात आहे. उमेदवार व समर्थक घरोघरी जावून मतदार राजाची मनधरणी करीत असल्याचे दिसून येत आहे. शिवाय सोशल माध्यमावर उमेदवार व त्यांच्या समर्थकांकडून प्रचाराची राळ उठविली जात आहे.
तर शेतात, वाड्यात तसेच धाबे व हॉटेलमध्ये मोठ्या प्रमाणात पार्ट्या दिल्या जात आहेत. विशिष्ट उमेदवाराच्या विजयासाठी ओल्या पाट्यांसह जेवनाळी सुरू असून सोशल मीडियाचा सुद्धा मोठ्या प्रमाणात गैरवापर केल्या जात आहे. सरपंचपदाचे तसे ग्रामपंचायत सदस्य पदाचे उमेदवार निशाणी चिन्ह सह व्हिडिओ स्टेटस ठेवून मतदारांना आवाहन करीत असून, फेसबुक, व्हाट्सअप ग्रुप आदी सोशल मीडिया वर मोठ्या प्रमाणात प्रचार करीत आहेत. कोणत्याही निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी आचारसंहिता व नियमाचे पालन होणे गरजेचे असून प्रचारासाठी निवडणूक विभागाची पूर्वपरवानगी घेवून त्याची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. मात्र, यंदाची निवडणूक याला अपवाद ठरू पहात असल्याचे दिसून येत आहे. अनेक उमेदवारांनी व त्याच्या समर्थकांनी सोशल मीडिया वरून प्रचार करून विविध पॅनलकडून आरोप प्रत्यारोप आरोप केल्या जात आहेत.
मतदारांना प्रलोभने
ग्रामपंचायतीची निवडणूक सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी प्रतिष्ठेची केली. त्यामुळे ही निवडणूक अटीतटींच्या व चुरशीची होणार असल्याचे दिसून येते. या निवडणुकीत आपले वर्चस्व प्रस्तापित करण्यासाठी गावपुढारी व उमेदवारांकडून विविध प्रलोभणे दिल्या जात आहेत. शिवाय सर्वच उमेदवार विकासाचा मुद्दा घेवून निवडणूक मैदानात उतरले असून सोशल मीडियावर प्रचाराचा भडिमार सुरु आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.