आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोरोनाकाळात विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सामाजिक अंतर ठेवणे, चेहऱ्यावर मास्क लावणे इत्यादींचे पालन करण्याची कारवाई करण्याकरिता जालना नगर परिषदेमार्फत पथक नेमण्यात आले होते. दंडात्मक रकमेत १८ लाखांची अफरातफर आढळून आली. तसेच तीन बनावट पुस्तके तयार करून वसुली केल्यामुळे अतिरिक्त मुख्याधिकारी महेश शिंदे यांच्या फिर्यादीवरून तत्कालीन प्रभारी लिपिक संतोष दिनकरराव अग्निहोत्री याच्याविरुद्ध कदीम पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बनावट पुस्तकांची छपाई परतूर येथे केली असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. कोरोनाकाळात विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पथकांकडून कारवाया केल्या जात होत्या. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाया करून दंड वसूल केला जात होता. नगरपालिकेने नेमलेल्या पथकांच्या माध्यमातून ४२ लाख ७२ हजार ४४० रुपयांचा दंड वसूल झाला होता. यात प्रभारी लिपिक संतोष अग्निहोत्री यांनी २४ लाख ४० हजार रुपये रोखपाल यांच्याकडे जमा केली. परंतु, उर्वरित १८ लाख ३२ हजार ४४० रुपये नगर परिषदेत जमा केलेच नाही. तसेच त्यांच्या ताब्यात असलेल्या ३९५ पावती पुस्तकांपैकी ४५ पुस्तकांचा हिशेब दाखल केला नाही. तसेच तीन बनावट पुस्तके तयार करून वसुली केल्याचे निष्पन्न झाल्यामुळे अग्निहोत्री याच्याविरुद्ध कदीम ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जालना शहरातील साद बिन मुबारक यांनी जालना नगरपालिका प्रशासनाकडे तक्रार अर्ज करून या सर्व पावती पुस्तकांचा हिशेब मागितला होता. पालिकेचे मुख्याधिकाऱ्यांनी लेखापरीक्षक श्रीरंग भुतडा यांना चौकशी अधिकारी म्हणून नियुक्त केले. या चौकशीमध्ये संतोष अग्निहोत्री यांनी भांडार कक्ष नगर परिषद कार्यालय जालना येथून ताब्यात घेतलेल्या एकूण ३९५ सामान्य पावती पुस्तकांपैकी ३४७ पावती पुस्तके तपासणीकरिता चौकशी अधिकाऱ्यांकडे उपलब्ध करून दिली. उर्वरित ४८ पावती पुस्तके उपलब्ध करून दिली नाहीत. उलट तीन बनावट पावती पुस्तके तयार करून जमा केली. या प्रकरणाचा अधिक तपास पीआय मजहर सौदागर हे करीत आहेत.
आरोपी वाढतील : तक्रारदार या प्रकरणात मुख्यमंत्र्यांपर्यंत तक्रार केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासात अजून आरोपी वाढतील, अशी माहिती तक्रारदार साद बिन यांनी दिली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.