आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेत शिवार:जालना जिल्ह्यात शेतकऱ्यांना पर्यावरण-पूरक चळवळीबाबत प्रोत्साहित करू; राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची पर्यवरण अभ्यासक पाशा पटेल यांना दिली ग्वाही

जालना13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

​​​​​​पर्यावरण अभ्यासक पाशा पटेल यांच्या बांबू लागवड चळवळीची दखल घेत केंद्रीय रेल्वे, खाण व कोळसा राज्यमंत्री रावसाहेब दानवे हेदेखील आपल्या शेतात बांबू लागवड करणार असून, त्यांनी नळणी (ता. भोकरदन) येथील शेतात पाशा पटेल यांच्यासोबत नुकतीच पाहणी केली. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या पर्यावरणपूरक चळवळीबाबत प्रोत्साहित करू, असे त्यांनी सांगितले.

पाशा पटेल हे वर्षभरापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील प्रदूषण मुक्त भारत घडविण्याच्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून पर्यावरणपूरक बांबू लागवड व उपयोगिता ही चळवळ देशभर राबवित असून, बांबू हे आर्थिक सुबत्ता प्राप्त करून देणारे शाश्वत पिक म्हणून कसे पुढे येत आहे, याबाबतची जनजागृती करत आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक जालना जिल्ह्यात ही चळवळ प्रभावीपणे राबविली जात आहे. दिवसेंदिवस बांबू लागवडीचे क्षेत्र वाढत चालले आहे. आता केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे हे भोकरदन तालुक्यातील नळणी येथील आपल्या शेतात बांबू लागवड करून आधी केले मग सांगितले या संतोक्तीप्रमाणे शेतकऱ्यांना प्रोत्साहित करणार आहेत.

शनिवारी मुंबई येथून मंत्री रावसाहेब दानवे आणि पाशा पटेल हे सोबतच औरंगाबाद येथे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांच्या मुलाच्या स्वागत समारंभास जाण्यासाठी देवगिरी एक्सप्रेसने सकाळी जालन्यात आले. औरंगाबादचा कार्यक्रम सायंकाळी असल्याने तसेच भोकरदन तालुक्यात काही नियोजित कार्यक्रम असल्याने ना. दानवे हे पाशा पटेल यांना सोबत घेऊन फिरले. रस्त्याने हे दोघे ना. दानवे यांच्या नळणी येथील शेतात पोहोचले. आपणासही बांबू लागवड करायची आहे, असे सांगत पाशा पटेल यांच्याशी त्यांनी बांबू लागवड येथे कोठे आणि कशी करता येईल, कोणती रोपे लावावीत, याबाबत चर्चा केली आणि सुरुवातीला आपल्या शेतात ५ एकरापासून बांबू लागवडीला सुरुवात करणार असून नदीकाठीही बांबू लागवड करणार असल्याचे ते म्हणाले.

यावेळी उभयतादरम्यान झालेल्या चर्चेत पाशा पटेल यांनी मंत्री रावसाहेब दानवे यांना बांबू लागवड चळवळीची आणि बांबूपासून तयार होणाऱ्या १८०० वस्तूंची माहिती दिली. पाशा पटेल यांनी त्यांना बांबूपासून निर्मित टूथब्रश तर बांबू लागवड चळवळीचे जिल्हा समन्वयक डॉ. सुयोग कुलकर्णी, उटवदचे शेतकरी योगेश शिंदे यांनी बांबूची रोपे भेट दिली. यानंतर भोकरदन येथील एका नियोजित कार्यक्रमात बोलताना ना. रावसाहेब दानवे म्हणाले की, पाशा पटेल यांच्याकडून मोठ्या प्रमाणात बांबू लागवडीचा प्रचार आणि प्रसार सुरू आहे.

बांबू लागवडीसाठी शेतकरी अनुकूल-डॉ. कुलकर्णी
जालना जिल्ह्यातील शेतकरी बांबू लागवडीसाठी सकारात्मक प्रतिसाद देत असून, अनेक जण स्वयंस्फूर्तीने पुढे येत आहेत. याबाबत त्यांना कोणत्या जातीची रोपे कोणत्या उपयोगीतेसाठी उपयुक्त आहेत, बांबू खरेदीसाठी बाजारपेठ आदींबाबत शास्त्रोक्त माहिती दिली जात आहे. पारंपरिक पिकांच्या तुलनेत बांबूपासून शेतकऱ्यांना चांगला लाभ होऊ शकतो, अशी माहिती यावेळी बांबू लागवड चळवळीचे जिल्हा समन्वयक डॉ. सुयोग कुलकर्णी यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...