आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मूर्ती चोरी:जांबसमर्थमधील मूर्ती चोरीचा 15 दिवसांनंतरही तपास नाही

जालना25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वामी रामदास यांच्या पूर्वजांच्या जांबसमर्थ येथील मूर्ती चोरी प्रकरणाचा पंधरा दिवसांनंतरही छडा लागलेला नाही. या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलिस अधीक्षक अक्षय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळी पथके तयार करण्यात आली आहेत. परंतु अजूनही या गुन्ह्याच्या अनुषंगाने काहीच सुगावा लागलेला नाही. जांबसमर्थ येथे रोज कोणी ना कोणी लोकप्रतिनिधी येऊन तपासाबाबत सूचना करीत आहेत. तपास न लागल्यास कुणी आंदोलनाचा इशाराही देत आहेत. जांबसमर्थच्या चोरीचा तपास लागत नसल्याने पोलिसांचे गुप्त बातमीदार लुप्त झाले की काय, असा प्रश्नही नागरिकांतून उपस्थित होत आहे.

जिल्ह्यातील पोलिस यंत्रणा व राज्य सरकारच्या तांत्रिक तपास यंत्रणांनी चोरट्यांना जेरबंद करण्यासाठी संपूर्ण शक्ती पणाला लावत आहेत. राज्यातील ज्या ठिकाणी अशा प्रकारच्या मूर्ती चोरीच्या घटना घडल्या आहेत, अशा ठिकाणच्या तपासाच्या पूर्ण शक्यता लक्षात घेऊन राज्यभरात हा शोध घेणे सुरू आहे. जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठाण्यातील अधिकारी- कर्मचाऱ्यांचीही वेगवेगळी पथके या गुन्ह्याच्या तपासासाठी नेमली आहेत.

जवळपास आठ पथके या गुन्ह्यावर काम करीत आहेत. परंतु पंधरा दिवस होऊनही एकाही पथकाला कुठलीच माहिती मिळत नसल्याने ही चोरी उघड करणे अजूनच किचकट होत चालले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रेकॉर्डवरील चोरट्यांची चौकशी केली आहे. तसेच सोलापूर जिल्ह्यातील काही गुन्हेगारांकडूनही या प्रकरणाबाबत संशय व्यक्त केला जात असल्याने त्या अनुषंगानेही चौकशी केली आहे. चोरीस गेलेल्या मूर्तींचे फोटो सुद्धा विविध पोलिस ठाण्यांमध्ये पाठवून या मूर्तींची कुठे विक्री होते का, या अनुषंगाने सराफा व्यापाऱ्यांनाही सूचना केलेल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...